Join us

'नवा गडी नवं राज्य' मालिकेत मोठा बदल, साईशाच्या जागी दिसणार ही प्रसिद्ध बालकलाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2023 8:51 AM

पैशांच्या हेरगिरीप्रकरणी साईशाच्या आईला काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली आहे. यानंतर तिचे वडीलही फरार झालेत. आता साईशा ही 'नवा गडी नवा राज्य' मालिकेत दिसणार नसल्याचं कळतंय.

'नवा गडी नवा राज्य' या सध्या गाजत असलेल्या मराठी मालिकेतील बालकलाकार चिंगी म्हणजेच साईशा भोईर (Saisha Bhoir) अल्पावधीतच लोकप्रिय झाली. पैशांच्या हेरगिरीप्रकरणी साईशाच्या आईला काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली आहे. यानंतर तिचे वडीलही फरार झालेत. आता साईशा ही 'नवा गडी नवा राज्य' मालिकेत दिसणार नसल्याचं कळतंय तिच्या जागी दुसऱ्या बालकलाकाराची वर्णी लागली आहे.

साईशाच्या जागी या मालिकेत आता बालकलाकार आरोही सांबरे झळकणार आहे.आरोहीच्या इन्स्टाग्राम अकाऊटंवर एक प्रोमो शेअर करत ही अपडेट दिली आहे. आरोही सांबरे ही सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत झळकली होती.

साईशाच्या आई पूजा भोईरला अटक झाल्यानंतर ती ही मालिका सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र सुरुवातीच्या दिवसांमध्ये साईशाच्या कामावर याचा कोणताच परिणाम होणार नाही असं म्हटलं जातं होते. ती अजून खूप लहान आहे घरात काय सुरु आहे हे समजण्याइतकी ती मोठी झालेली नाही. मात्र आता हे प्रकरण वाढत असल्यानं साईशा नवा गडी नवा राज्य आणि चला हवा येऊ द्या या दोन शोमध्ये दिसणार नाही आहे.   

काय आहे प्रकरणसाईशा भोईरची आई पूजा भोईर विरोधात गेल्या महिन्यातच एका महिलेने तक्रार केली होती. सोशल मीडियावर ओळख बनवत पूजा भोईरने त्या महिलेकडून बरेच पैसे उकळले होते. यानंतर मुंबईसह नाशिक, लातूरमधूनही अनेकांनी तक्रारी दाखल केल्या. या सर्व तक्रारींनंतर पूजा भोईरला अटक करण्यात आली. ७ जुलैपर्यंत तिला कोठडी सुनावण्यात आली आहे. तर पूजा अटकेनंतर तिचा पती म्हणजेच साईशाचे वडील विशांत भोईर फरार झालेत. विशांतने देखील अनेकांना फसवल्याचं समोर आलं आहे. सध्या पोलिस तपास करत आहेत. तसंच लवकरच आर्थिक गुन्हे शाखा हे प्रकरण हाती घेणार आहे.

आठवड्याला १०.१० टक्के नफा!पुजाचा ऑप्शन्स स्ट्रॅटेजी मॉडेल नावाने गुंतवणुकीचा व्यवसाय असून त्यावर दर आठवड्याला १०.१० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष तिने एका व्यावसायिकाला दाखवले. त्यानुसार त्यांनी आणि पत्नीने ६ आणि १० मिळून १६ लाख रुपये पूजाच्या कंपनीत गुंतवले. तिने ५ डिसेंबर २०२२ रोजी एकूण नफ्यातील ३० टक्के कमिशन कापत उरलेले पैसे दोघांच्याही बचत खात्यावर जमा केले. दुसरा महिन्यातही तिने परतावा दिला. मात्र त्यानंतरच्या परताव्याबाबत ती टाळाटाळ करू लागली आणि त्यामुळे व्यवसायिकाने १० फेब्रुवारी २०२३ रोजी गुंतवणूक केलेली रक्कम परत मागितली. पूजा ने त्यांना १७ फेब्रुवारीला दोन चेक नोकरामार्फत एस एसएआय ॲडव्हायझर इन्व्हेस्टमेंट या नावाने दिले. २८ फेब्रुवारी पर्यंत रक्कम जमा न झाल्यास ते चेक बँकेत भरायला पूजाने पत्कींना सांगितले जे बाऊन्स झाले.

टॅग्स :टिव्ही कलाकारझी मराठीगुन्हेगारी