प्रत्येक स्त्रीसाठी तिचा नवरा म्हणजे तिचा अभिमान असतो. नवरा म्हणजे तिचा जोडीदार, सखा आणि तिच्या चेहऱ्यावर हसू आणणारा संसाराचा आधारस्तंभ. कलर्स मराठी वाहिनी नवरा असावा तर असा या कार्यक्रमाद्वारे नवऱ्यांना त्यांच्या प्रिय व्यक्तीचे म्हणजेच बायकोचे मन जिंकण्याची एक संधी दर आठवड्यात देते. टेलिव्हिजनवर आपण गृहलक्ष्मींना त्यांच्या इच्छापूर्तीसाठी खेळताना बघितले पण या कार्यक्रमाद्वारे पहिल्यांदाच आपल्या लाडक्या गृहलक्ष्मीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे नवरे या खेळात भाग घेताना आपण पाहत आहोत. कार्यक्रमाच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेक्षकांची चांगलीच पसंती कार्यक्रमाला मिळत आहे. या कार्यक्रमाने नुकताच ३०० भागांचा पल्ला गाठला आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री हर्षदा खानविलकर करत आहे. कार्यक्रमामध्ये आलेल्या जोड्या हर्षदा ताईशी मनमोकळे पणे गप्पा मारतात, त्यांच्या आठवणी - त्यांचा प्रवास सांगतात. प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रेमामुळेच “नवरा असावा तर असा” या कार्यक्रमाने ३०० भाग पूर्ण केले आहेत.आगळ्यावेगळ्याने संकल्पनेमुळे हा कार्यक्रम अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकत आहे. इतकेच नव्हे तर हर्षदाताई यांची वेशभूषा, त्यांच्या साड्या, त्यांची “नवरा असावा तर असा” हे बोलण्याची पद्धत देखील प्रेक्षकांना आवडत आहे. या क्षणी बोलताना त्या म्हणाल्या, “नवरा असावा तर असा हा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला तेव्हा कल्पना नव्हती हा प्रवास कसा होईल? काय होणार पुढे ? कसे होणार सगळे ? कारण, मी पहिल्यांदाच सूत्रसंचालन करणार होते. काही अनुभव नव्हता, पण मी आव्हाने स्वीकारले. आता जवळपास वर्ष झाले खूप मजा येते आहे. बऱ्याच धमाल जोडप्यांना भेटले, त्यांचे अनुभव, त्यांच्या गोष्टी ह्रदयाला भिडल्या हा अनुभव मी शब्दांमध्ये व्यक्त नाही करू शकत कारण मी हे रोज अनुभवते आहे. ही जोडपी नव्हे तर यांचे संपूर्ण कुटुंब माझ्या आयुष्याचा भाग होत आहे. या सगळ्यासाठी कलर्स मराठी वाहिनीचे खूप आभार. रसिक प्रेक्षकांचे प्रेम माझ्यावर होते, आहे आणि ते तसेच राहील अशी अपेक्षा आहे”.
'नवरा असावा तर असा'ने गाठला ३०० भागांचा टप्पा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 4:42 PM