सध्या नवरात्र सुरू आहे. या काळात माँ दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. तसेच शक्तीस्वरूप दुर्गेसाठी उपवास केला जातो. आद्यशक्तीची उपासना करण्यासाठी नवरात्र हा सर्वोत्तम काळ मानला जातो. या नवरात्रीत अनेक स्त्रिया कडक व्रत करताना दिसतात. या काळात अनेक जण पायात चप्पल घालत नाहीत. मराठी सिनेसृष्टीतील एक अभिनेत्रीही अत्यंत भक्ती भावाने नवरात्रीत ९ दिवस पायामध्ये चप्पल घालत नाही. ही अभिनेत्री आहे सुखदा खांडेकर.
यंदाच्या नवरात्रीत सुखदा हिने नवदुर्गा फोटोशूट केलं आहे. तिने याचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सुखदाचं देवीच्या रूपात केलेलं फोटोशूट चर्चेत आहे. सुखदा खांडेकरचं नवरात्रीत चप्पल न घालण्याचं अभिनेत्रीचं तेरावं वर्ष आहे. नुकत्याच महाराष्ट्र टाईम्साल दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल सांगितलं आहे. यासोबत ती ही प्रथा का जपते, याचे कारणही तिने सांगितले.
ती म्हणाली, "नवरात्रीत चप्पल न घालण्याचं माझं हे तेरावं वर्षं आहे. आपण एखाद्या गोष्टीशिवाय राहू शकत नाही. त्याचा त्याग किंवा उपवास केला जातो. मी नृत्यांगना असल्यानं माझं माझ्या पावलांवर खूप प्रेम आहे. नवरात्रीत देवीसाठी असं काहीतरी सोडेन, ज्या गोष्टीवर माझं प्रेम आहे. या काळात चप्पल घालत नसल्यानं पावलांची खूप हौसमौज करते. विविध प्रकारचे सुंदर पैंजण, जोडवी घालते. मेहंदी, अल्तासुद्धा लावते".
उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर सुखदा आज लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मराठी कलाविश्वासह सुखदा हिंदी मालिकाविश्वातही चांगलीच सक्रीय आहे. तिने आजवर अनेक गाजलेल्या हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. सुखदाने बाजीराव मस्तानी, उमराव, गुरुकूल यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलं आहे. सुखदा लोकप्रिय अभिनेता अभिजीत खांडकेकर याची पत्नी आहे. अभिजीत आणि तिने १ फेब्रुवारी २०१३ मध्ये लग्नगाठ बांधली आहे.