सूरज तो रोजही जीतता है, चाँद का भी तो दिन आता है ना,” आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलविणाऱ्या या सडेतोड संवादाने ‘द लास्ट कलर’ या अप्रतिम चित्रपटातून आपल्याला आजच्या या वेगवान जगात आशेचा किरण डोकावताना दिसेल. येत्या 12 जानेवारी रोजी रात्री 8.00 वाजता ‘अॅण्ड पिक्चर्स एचडी’ वाहिनीवर ‘द लास्ट कलर’ या चित्रपटाचा ‘जागतिक एचडी प्रीमिअर’ प्रसारित केला जाईल. हाऊस ऑफ ओमकार निर्मित आणि ‘फिल्म कारवाँ’ ह्या वितरण भागीदारासोबत ‘मिशेलिन स्टार’ मिळविलेले शेफ विकास खन्ना यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट तुमच्या हृदयात आपले स्थान निर्माण करणार असून तुम्हाला भावनावश आणि उत्साहभरित करून सोडणार आहे.
चित्रपटाचे कथानक बनारसमध्ये घडते. त्यात भारतातील वृंदावन आणि वाराणसीमधील विधवांवर असलेल्या अनेक वर्षांच्या बंदीचा विषय हाताळला आहे. ‘द लास्ट कलर’मध्ये नूर (नीना गुप्ता) या विधवेचे छोटी (अक्सा सिद्दिकी) या एका छोट्या मुलीशी असलेल्या नात्याचा वेध घेतला आहे. ही छोटी नूरच्या जीवनात प्रेम, आनंद आणि रंग कसे फुलविते, त्याची कथा यात चित्रीत केली आहे. हरहुन्नरी आणि गुणी अभिनेत्री नीना गुप्ता ही नूरच्या व्यक्तिरेखेत सहजतेने प्रवेश करते आणि आपल्या शक्तिशाली अभिनयाने पडदा व्यापून राहते. कोणत्याही भूमिकेत स्वत:ला विरघळवून टाकून तिच्याशी एकरूप होण्याबद्दल नीना गुप्ताची ख्याती असून सर्वजण तिला प्रेमाने ‘नीनाजी’ म्हणतात. सर्व वयोगटातील प्रेक्षकांकडून नीना गुप्ताला पसंत केले जाते. कोणत्याही भूमिकेशी एकरूप होणे, त्या भूमिकेचा नैसर्गिकरीत्या आविष्कार करणे आणि त्या व्यक्तिरेखेवर मनापासून प्रेम करण्याच्या त्यांच्या गुणांमुळे प्रेक्षकांची त्यांच्याकडून अपेक्षा वाढतच जाते.
मन गुंतवून ठेवणारे कथानक सामान्य प्रेक्षकांपर्यंत आणण्याबद्दल दिग्दर्शक विकास खन्ना प्रसिध्द आहेत. व्यवसायाने शेफ असलेले खन्ना आता चित्रपटदिग्दर्शनाकडे वळले आहेत.
अभिनेत्री नीना गुप्ता म्हणाल्या, “मी जेव्हा या चित्रपटाची पटकथा ऐकली, तेव्हा माझ्या मनात अनेक भावनांनी गर्दी केली. जगाने हा चित्रपट पाहिला पाहिजे, अशी भावना माझ्या मनात निर्माण झाली. विकासने प्रेक्षकांसमोर असा अप्रतिम दृष्टिकेन मांडल्याचा मला खूप आनंद होत आहे. त्याच्याबरोबर काम करणं हा माझ्यासाठी मन ताजंतवानं करणारा आणि माझ्यातील सर्जनशीलता पूर्ण करणारा अनुभव होता. यातील प्रत्येक प्रसंग हा त्याच्या परीने आव्हानात्मक आहे आणि त्यातून मला माझ्यातील अभिनयगुणांच्या गहनतेचा शोध घेता आला. चित्रपटाचं चित्रीकरण बनारसच्या घाटांवर झालं असून तो अनुभव खूपच सुखद होता. माझी नूरची व्यक्तिरेखा आणि केवळ नऊ वर्षांच्या छोटी या मुलीशी असलेलं माझं नातं हा या चित्रपटाचा गाभा आहे. ही भूमिका अक्सा सिद्दिकीने साकारली आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट पाहताना खूप आनंद होईल, अशी मी आशा करते.”