गेल्या काही दिवसांपासून 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath) या मालिकेत नेहा आणि यशच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. साखरपुडा, मेहेंदी, हळद अशी रीतसर लग्नाची लगबग या मालिकेत पाहायला मिळत आहे. आता नेहा आणि यशच्या संगीत सोहळ्यात बंडू काका काकू, विश्वजित ,मिथिला , परी, समीर शेफाली, सिम्मी काकू, आजोबा हे सर्वच जण गाण्यावर थिरकताना दिसणार आहेत. तर उद्या रविवारी म्हणजेच १२ जून रोजी दोन तासांच्या विशेष भागात हा लग्नसोहळा पार पडणार आहे. या दोन तासांच्या भागामध्ये परी आपल्या आईसाठी एक खास गाणं गाणार आहे. माझ्या आईच्या लग्नाला यायचं हं असं म्हणत या परीने मालिकेच्या प्रेक्षकांना आमंत्रण दिले आहे.
आपल्या आईच्या आणि फ्रेंडच्या लग्नात परी धमाल मस्ती करताना दिसत आहे. थाटामाटात होणार आईचं लग्न…हे परीवर चित्रीत झालेलं गाणं नुकतंच रेकॉर्ड करण्यात आलं आहे. हे गाणं गायलं आहे पलाक्षी दीक्षित या बाल गायिकेनं. काही महिन्यांपूर्वीच झी मराठी वाहिनीवर सारेगमप लिटिल चॅम्पस हा रिएलिटी शो पार पडला. या शोमध्ये पलाक्षी दीक्षितने सहभाग दर्शवला होता. या शोमध्ये तीने फायनलिस्ट होण्याचा मान पटकावला होता. पलाक्षीने आपल्या सुंदर आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती.
आता तिला झी मराठी वाहिनीने मालिकेसाठी एक गाणं गाण्याची संधी दिली आहे. प्रसिद्ध संगीतकार कुणाल करण यांच्या एलिक्सर स्टुडिओमध्ये आईचं लग्न हे गाणं नुकतंच रेकॉर्ड करण्यात आलं आहे. पलाक्षीने परीसाठी हे खास गाणं गायलं आहे. त्यामुळे हे पहिलं वहिलं गाणं रेकॉर्ड होत असताना पलाक्षी खूपच आनंदी दिसत आहे.
उद्याच्या भागात परीचे हे खास गाणं प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या गाण्याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे.