स्टार प्लस वाहिनीवर नुकतीच 'उडने की आशा' (Udane Ki Aasha) ही नवी मालिका दाखल झाली आहे. या मालिकेत कंवर ढिल्लन (सचिन) आणि नेहा हरसोरा (सायली) यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. सचिन आणि सायली यांच्या प्रेमाची कथा आणि नातेसंबंधांची गुंतागुंत या मालिकेतून सादर केली जात आहे. या मालिकेला मराठमोळी पार्श्वभूमी लाभली आहे. उडने की आशा या मालिकेत एका पत्नीच्या भावभावनांच्या कल्लोळाचे चित्रण करण्यात आले आहे. ती तिच्या बेजबाबदार पतीचे रूपांतर जबाबदार व्यक्तीत कसे करते आणि याचा काही प्रमाणात संपूर्ण कुटुंबावर कसा परिणाम होतो, यावर बेतलेले हे नाट्य प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर खिळवून ठेवत आहे.
कंवर ढिल्लनने सचिनची भूमिका साकारली आहे, जो एक टॅक्सी ड्रायव्हर आहे, तर नेहा हरसोराने या मालिकेत सायली या फुल विक्रेतीची भूमिका साकारली आहे. उडने की आशा या शोसाठी निर्मात्यांनी अलीकडेच एक प्रोमो प्रदर्शित केला आहे, ज्यात प्रेक्षकांना सचिन आणि सायली यांच्या लग्नाची झलक दाखवण्यात आली आहे. सचिन आणि सायलीचे लग्न हे एक मराठमोळ्या पद्धतीने होणार आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्राने रात के ढाई बजे गाण्यात ज्याप्रमाणे नववधूचा लूक केला होता तशी नऊवारी साडी सायलीने परिधान केलेली दिसेल आणि यात सायलीने अगदी प्रियांका चोप्रासारखा वाटेल. तिला बघताना आपल्या सर्वांना अभिनेत्री प्रियांका चोप्राची नक्की आठवण होईल. प्रियांकाने या गाण्यातील तिच्या उपस्थितीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, सायली छोट्या पडद्यावरही पुन्हा तीच मोहिनी निर्माण करेल.
नेहा हरसोराने सांगितले, उडने की आशा या मालिकेतील आगामी लग्नसोहळ्यात, प्रेक्षकांना अद्भुत नाट्य बघायला मिळेल. मालिकेतील नाट्य अनेक वळणे घेत असून सचिन आणि सायलीच्या आयुष्याचे दार ठोठावणार आहे. या मालिकेत मी सायली या मराठमोळ्या मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे. मला मराठमोळ्या वधूची व्यक्तिरेखा साकारताना खूप छान वाटले. सायलीच्या लग्नसोहळ्यातील वधूच्या वेषातून अभिनेत्री प्रियांका चोप्राने साकारलेल्या रात के ढाई बजे गाण्यातल्या लग्नाच्या वेषाची झलक दिसते आणि आपण त्या आठवणीत रमायला लागतो. रात के ढाई बजे या गाण्यातील प्रियांका चोप्रा आणि उडने की आशा या मालिकेतील सायली या दोघींनीही नऊवारी साडी परिधान केली आहे. मला लग्न सोहळ्यातील मराठमोळे विधी करताना आनंद वाटला आणि मला लग्न सोहळ्यात केल्या जाणाऱ्या विधींची माहितीही झाली. सचिन आणि सायलीच्या आयुष्यात उलगडत जाणारे नाट्य आणि ते दोघे अनपेक्षित परिस्थितीला कसे सामोरे जातात हे जरूर पाहा."