‘इंडियाज फायनेस्ट फिल्म्स’मध्ये ‘नील बटे सन्नाटा’चा खास शो
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 7:18 AM
आपल्या ‘वो जमाना, करें दीवाना’ या ध्येयास अनुसरून ‘झी क्लासिक’ वाहिनी शुक्रवार, 23 फेब्रुवारी रोजी रात्री 10.00 वाजता ‘इंडियाज फायनेस्ट ...
आपल्या ‘वो जमाना, करें दीवाना’ या ध्येयास अनुसरून ‘झी क्लासिक’ वाहिनी शुक्रवार, 23 फेब्रुवारी रोजी रात्री 10.00 वाजता ‘इंडियाज फायनेस्ट फिल्म्स’ या मालिकेअंतर्गत एका आई व मुलीची कथा सांगणाऱ्या ‘नील बटे सन्नाटा’ चित्रपटाचे प्रसारण करणार आहे. आपले सामाजिक स्थान काहीही असले, तरी प्रत्येक व्यक्तीला स्वप्ने पाहण्याचा आणि त्याद्वारे आपले जीवन बदलण्याचा अधिकार आहे, हे प्रतिपादन करत असलेला हा चित्रपट आहे. स्वरा भास्कर (चंदा सहाय) आणि रिया शुक्ला (अपेक्षा शिवलाल सहाय) यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून त्यांच्याशिवाय रत्ना पाठक-शहा, पंकज त्रिपाठी आणि संजय सुरी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. नील बटे सन्नाटा चित्रपटाची कथा आग्रा शहरात घडते. आपल्याला जी संधी मिळाली नाही, ती आपल्या मुलीला मिळावी आणि तिचे भवितव्य उज्ज्वल व्हावे, यासाठी धडपड करणाऱ्या एका मोलकरणीची कथा या चित्रपटात सादर केलेली. आहे. वेगवेगळ्या घरांमध्ये मोलमजुरीची कामे करून चंदा (स्वरा भास्कर) आपल्या मुलीला, अपेक्षाला (रिया शुक्ला)शिक्षण देण्याची धडपड करीत असते. परंतु अपेक्षाला शिक्षणाची अजिबात आवडच नसते. एका कामवाल्या बाईची मुलगीही कामवाली बाईच होणार, असे ती आपल्या आईला सांगते. आपल्या मुलीचे हे विचार ऐकून चंदा हादरते आणि तिला ताळ्यावर आणण्यासाठी एक वेगळाच मार्ग अनुसरते, हे दिग्दर्शिका अश्विनी अय्यर- तिवारी यांनी अतिशय सुरेख पध्दतीने दाखवून दिले आहे. अपेक्षाला गणित विषयात अजिबातच गती आणि गम्य नसते. तिला खाजगी शिकवणी लावूनही उपयोग होत नाही, हे पाहिल्यावर चंदा स्वत:च तिच्या सरकारी शाळेत एक विद्यार्थिनी म्हणून भरती होते. या कामी तिला तिची मालकीणीची (रत्ना पाठक-शहा) हिची मदत होते. विनोदी स्वभावाचे शाळेचे मुख्याध्यापक (पंकज त्रिपाठी) हेही चंदाची मदत करतात. शाळेत काही हुशार विद्यार्थी असतात, तसेच काही ‘ढ’ (नील बत्ती सन्नाटा) विद्यार्थीही असतात. वर्गातअपेक्षाची आई तिच्याशी स्पर्धा करते आणि त्यामुळे अपेक्षा बंड करते.आईला आपल्याच वर्गात शिकताना पाहून अपेक्षाची प्रतिक्रिया काय होते? तिच्या मनात शिक्षणाची आस निर्माण होऊन ती मोठेपणी कोणी बडी व्यक्ती होण्याची शक्यता निर्माण होते का?