स्टार प्रवाहवरील (Star Pravah) ‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkyanchi Rangoli) मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या मालिकेत कानिटकर आणि वर्तक कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. अपूर्वा आणि शशांकची मालिकेतील केमिस्ट्री लोकांना चांगलीच भावली आहे. तुम्हीही या मालिकेचे चाहते असाल तर बातमी थोडी निराश करणारी आहे. होय, मालिका रंजक वळणावर असताना आता एका अभिनेत्री या मालिकेला रामराम ठोकला आहे. मालिका सोडणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव आहे स्रेहलता माघाडे (Snehalata Maghade). स्रेहलता ही मालिकेत नेत्राची भूमिका साकारत होती.खुद्द स्रेहलतानं पोस्ट लिहून मालिका सोडल्याचं जाहिर केलं आहे. मालिका का सोडली, याचं नेमकं कारण तिने लिहिलेलं नाही. पण ही मालिका सोडताना नेत्राला तिने खास मॅसेज दिला आहे.
आपल्या पोस्टमध्ये ती लिहिते, ‘ हे तुझ्यासाठी आहे नेत्रा, मला माहित आहे की तू एक खंबीर आणि स्वतंत्र स्त्री आहेस. तुझ्यासाठी काय योग्य आणि अयोग्य आहे हे तुला माहीत आहे आणि त्यासाठी लढण्याची तुझ्यात हिम्मत आहे. दु:खाची गोष्ट म्हणजे तुझं नशीब सर्वात कुटिल आहे. तू नेहमीच खूप काही सहन करतेस आणि एखादा टक्का आनंद मिळवतेस. पण आनंदाचा तो एक थेंब तुझ्यासाठी नेहमीच पुरेसा असतो. मला माहित आहे की तू माझ्यावर रागावली आहेस की, मी तुला एकटं सोडून गेले. पण मला आशा आहे की तू मला समजून घेशील आणि तुला आनंद होईल की ही माझी नवीन सुरुवात आहे. नेत्रुदी मला नेहमीच तुझी आठवण येईल. या संपूर्ण जगात तुज्या वेदना माझ्यापेक्षा कोणीही समजणार नाही.’
तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. आम्ही तुला मिस करू नेत्रा..., तू या भूमिकेला 100 टक्के न्याय दिलास..., अशा कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत. तू मालिका सोडायला नको होती. तुझे एक्सप्रेशन आणि तुझा अॅटिट्यूड नवीन नेत्राला जमणार का? अशी कमेंट एका चाहत्यानं केली आहे.
एकंदर तिने मालिका सोडल्यानं चाहते निराश आहेत. पण तिनं चाहत्यांची समजूत काढली आहे. ‘ मी या मालिकेत नसले तरी अप्पू, शशांक, कुक्की, मानसी, अमेय, निखिल, बाबी आत्या आणि सारिका आत्या या सर्वांवर तुम्ही खूप प्रेम करा. आणि ही मालिका तुम्ही जरूर पहा’, असं आवाहन स्रेहलतानं केलं आहे.