Join us

​तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील टप्पू सेनेसमोर नवे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2017 5:29 AM

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील टप्पू सेना ही प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. या टप्पू सेनामधील सगळे सदस्य ...

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील टप्पू सेना ही प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. या टप्पू सेनामधील सगळे सदस्य हे वयाने लहान असले तरी नेहमीच समाजातील विविध प्रश्नांवर आवाज उठवत असतात. गोकुळधाम सोसायटीमधील सगळ्या लहान मुलांच्या परीक्षा आता संपल्या असून सगळीकडे सुट्टीचे वातावरण आहे आणि त्यामुळे गोकुळधाम सोसायटीत सध्या रोज क्रिकेटचे सामने रंगू लागले आहेत. केवळ लहान मुलेच नाही तर मोठेदेखील या खेळात सहभागी होत आहेत. गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी असलेल्या आत्माराम भिडेला त्याच्या बॅटिंगविषयी प्रचंड आत्मविश्वास आहे आणि त्यामुळे त्याला टप्पू सेनाने आऊट करून दाखवावे असे आव्हान तो टप्पू सेनाला देणार आहे. पण काहीही केल्या भिडेला आऊट करणे टप्पू सेनाला शक्य होणार नाही. पण चंपक चाचा त्याला आऊट करणार आहेत. पण फिल्डिंग करताना चेंडू दूर गेल्याने टप्पू सेनाला एक छोटासा मुलगा तिथे उभा राहिलेला दिसणार आहे. तो अतिशय अशक्त असून कित्येक दिवसांपासून त्याने काहीही खाल्लेले नाहीये. त्यामुळे टप्पू सेना त्याला घरी घेऊन येणार आहे आणि डॉ. हाथी त्याच्यावर उपचार करणार आहेत. या लहान मुलाला ते खायलादेखील देणार आहेत. पण त्याच्याशी बोलताना त्यांना कळणार आहे की, त्याचे आई वडील हे रस्त्यांवर वेठबिगारीचे काम करतात. पण त्यांचा कॉन्ट्रक्टर त्यांना पैसे देत नसल्याने त्यांच्याकडे जेवायलादेखील पैसे नाहीत. त्यामुळे आता टप्पू सेना चंपक चाचाच्या मदतीने या कॉन्ट्रक्टरचे खरे रूप समाजासमोर आणणार आहे. या मालिकेतील टप्पूची भूमिका साकारणारा राज अनादकत सांगतो, आजचे तरुण हे प्रचंड सजग आहेत. आपल्या समाजात आजूबाजूला काय सुरू आहे त्याची त्यांना चांगलीच कल्पना असते आणि समाजात बदल घडवण्यासाठीदेखील ते पुढाकार घेतात. त्यामुळे आम्ही मनोरंजनासोबत एक चांगला संदेश देण्याचा लोकांना प्रयत्न करत आहोत.