गेल्या काही वर्षांमध्ये छोट्या पडद्यावर अनेक बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक मालिकांच्या माध्यमातून ऐतिहासिक, पौराणिक घटनांवर प्रकाश टाकण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जीजामाता यांसारख्या अनेक थोर, शूरवीरांच्या कथा आतापर्यंत उलगडण्यात आल्या आहेत. यामध्येच भर घालत आणखी एका ऐतिहासिक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वराज्य सौदामिनी ताराराणी असं या आगामी मालिकेचं नाव आहे.
डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स निर्मिती 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेच्या माध्यमातून स्वराज्य अबाधित राखून ठेवण्यासाठी झटणाऱ्या महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. अलिकडेच या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी तब्बल ४०० जणींचं ऑडिशन घेण्यात आलं होतं.
सोनी मराठीवरील आगामी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेचा टीझर गेले कित्येक आठवड्यांपासून चर्चेत येत आहे. हा टीझर पाहून या मालिकेत महाराणी ताराराणी यांची भूमिका नेमकं कोण साकारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. मात्र, आता या भूमिकेवरील पडदा दूर सारण्यात आला आहे. ही भूमिका अभिनेत्री स्वरदा ठिगळे साकारणार आहे.
‘जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत हे स्वराज्य अबाधित राहील आणि त्या औरंग्याची कबर दख्खनच्या मातीत खोदली जाईल!’ हे ताराराणींचे स्वराज्याबद्दलचे शब्द आणि थेट युद्धभूमीवर मोगलांना सळो की पळो करून सोडणारे त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व साकारणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. त्यामुळेच या भूमिकेसाठी अत्यंत कठीण अशा ऑडिशन्स घेण्यात आल्या. यात राज्यभरातून जवळपास ४०० नामवंत ते नवोदित अभिनेत्रींनी ऑडिशन्स दिले होते. मात्र, अखेर स्वरदा ठिगळेची या भूमिकेसाठी वर्णी लागली.मराठी मनोरंजनक्षेत्रात आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवणारी स्वरदा, अभिनयाबरोबरच घोडेस्वारी आणि तलवारबाजीमध्ये निपुण असून या ऐतिहासिक मालिकेच्या निमित्ताने तिने पुन्हा एकदा कसून सरावाला सुरुवात केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करणार्या अपरिचित जाज्वल्य इतिहासाचे पर्व ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत उलगडणार आहे. येत्या १५ नोव्हेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.