सध्या छोट्या पडद्यावर अनेक नवनवीन मालिकांची रेलचेल सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यातील काही मालिका अल्पावधीत लोकप्रिय ठरत आहेत. त्यातलीच एक मालिका म्हणजे 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं'. नुकतीच सुरु झालेली ही मालिका लोकप्रिय होत असून या मालिकेत अभिनेता हार्दिक जोशी नव्या रुपात पाहायला मिळत आहे. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत रांगड्या राणादाची भूमिका साकारणारा हार्दिक या मालिकेत प्रॅक्टिकल असलेल्या सिद्धार्थची भूमिका साकारत आहे. मात्र, ही भूमिका साकारताना त्याला स्वत: काही बदलदेखील करावे लागले, असं एका मुलाखतीत त्याने सांगितलं.
"सिद्धार्थची भूमिका साकारताना मनावर थोडं दडपण होतं. कारण, आजही प्रेक्षक मला राणा म्हणूनच ओळखतात आणि याच नावाने हाक मारतात. त्यामुळे सिद्धार्थ म्हणूनही नवीन ओळख मला प्रेक्षकांसमोर निर्माण करायची आहे. त्यासाठी मी प्रयत्न करतोय. अगदी माझ्या पात्राची देहबोली, त्याचं दिसणं, वागणं बोलणं या प्रत्येक गोष्टीकडे मी बारकाईने लक्ष देतोय", असं हार्दिक म्हणाला.
पुढे तो म्हणतो, राणा आणि सिद्धार्थ खूप वेगळे आहेत. राणा हा इमोशनल होता. त्याच्याच उलट सिद्धार्थ आहे. सिद्धार्थ खूप प्रॅक्टिकल आहे. त्यामुळे दोन्ही विरुद्ध टोकाच्या भूमिका आहेत. पण, मी प्रत्येक भूमिकेसाठी माझे १०० टक्के देतो. आणि, मला खात्री आहे प्रेक्षक सुद्धा राणासारखंच सिद्धार्थवर प्रेम करतील.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत हार्दिकने सिद्धार्थची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री अमृता पवारदेखील मुख्य भूमिकेत झळकली आहे.