छोट्या पडद्यावर सध्या विनोदीकथा, भयकथा, प्रेमकथा, रहस्यकथा अशा सगळ्याच प्रकारच्या मालिका सुरू आहेत. या मालिकांमध्ये आणखी एका मालिकेची भर पडणार आहे. मराठी भाषा, मराठी संस्कृती यावर भाष्य करणारी, त्याचे जतन करण्याची गरज असल्याची शिकवण देणारी ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' असे या नव्या मालिकेचे नाव आहे. उच्च मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील सई केतकर हे या मालिकेतील मुख्य स्त्री पात्र आहे. सई एक साधी, सोज्वळ आणि मनमिळाऊ मुलगी आहे. अभिनेत्री गौरी कुलकर्णी ही भूमिका साकारणार आहे.
सई ही एका सामान्य मराठी घरातील मुलगी आहे. भारतीय संस्कृती, प्रथा-परंपरा यांचा सन्मान करणं, त्यांचं आचरण करणं तिला आवडतं. मराठी संस्कृतीविषयी तिचं असलेलं प्रेम, ही तिला तिच्या आजोबांकडून मिळालेली देणगी आहे. म्हणूनच, आजोबा तिच्यासाठी आदर्श आहेत. त्यांचे विचार तिला पटतात आणि सगळ्यांनाच पटावेत, त्यानुसार इतरांनी सुद्धा वागावं असं तिला वाटतं. आजोबांप्रमाणेच आजीशीदेखील तिचं फार छान जमतं. ती आजीची सर्वांत लाडकी आहे. आजीआजोबांच्या सहवासामुळेच तिचा स्वभाव फार प्रेमळ व मनमिळाऊ झाला आहे.
कुटुंबाविषयी विशेष आपुलकी, जिव्हाळा आणि प्रेम तिच्या वागण्यातून दिसून येतं. मराठीतून बी.ए. करतांना 'गोल्ड मेडल' मिळवणारी सई कथ्थक सुद्धा शिकलेली आहे. पण, नाचण्याचा छंद तिने केवळ स्वतःसाठी जोपासलेला आहे. अशी ही गोड मराठी मुलगी १५ जुलै पासून रसिकांच्या भेटीला येणार आहे.