Join us  

नवीन रहस्यमय मालिका 'तिकळी' लवकरच भेटीला, झळकणार पूजा ठोंबरे आणि वैष्णवी कल्याणकर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 6:30 PM

Tikali Serial : 'तिकळी' या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

सध्या टेलिव्हिजनवर नवीन मालिका दाखल होत आहेत. आता या यादीत आणखी एका मालिकेची भर पडली आहे. सन मराठी वाहिनीवर लवकरच 'तिकळी' (Tikali Serial) ही मालिका दाखल होत आहे. सन मराठी कौटुंबिक गोष्ट, सासू-सुनाची कथा, प्रेमकथा या सगळ्या विषयांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असताना, थरारक विषयावर आधारीत ‘तिकळी’ ही मालिका घेऊन येत आहे. या मालिकेतून पूजा ठोंबरे आणि वैष्णवी कल्याणकर हे कलाकार भेटीला येत आहे. अलिकडेच 'तिकळी' या मालिकेचा प्रोमो समोर आला असून या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

आता ही ‘तिकळी’ कोण किंवा नेमकी काय भानगड आहे, असा प्रश्न पडला असेल तर, ‘तिकळी’ मालिकेची झलक तुम्ही एकदा पाहाच. जिच्यासोबत गावकरी दोन हात लांब राहतात, जिचं आयुष्यात असणं म्हणजे आयुष्य बर्बाद होणं, ना घरची, ना दारची अशी आहे ‘तिकळी’. पण तिकळीचं नेमकं रहस्य काय, तिला दिसणारी ती व्यक्ती कोण, तिच्याशी संबंध न ठेवणं यातच आपले हित असा समज लोकांचा का आहे, इतकी आणि यापेक्षा जास्त मालिकाप्रती कुतुहलता ‘तिकळी’च्या प्रोमोने वाढवली आहे.

अभिनेत्री पूजा ठोंबरे आणि वैष्णवी कल्याणकर या दोघी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तिकळीची भूमिका वैष्णवीने साकारली आहे, पण प्रोमोमध्ये जी व्यक्ती दिसते जिचे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे ते पात्रं पूजा साकारत आहे. ‘तिकळी’च्या मागील गूढ सत्य लवकरच सन मराठी वाहिनीवर उलगडणार आहे.