बालपणातून खंबीर झालेली बेधडक, अन्यायाला वाचा फोडणारी, आपल्या कुटुंबासाठी लढणारी आजच्या काळातील 'दुर्गा' प्रेक्षकांना आपल्या लाडक्या 'कलर्स मराठी' वाहिनीवर येत्या २६ ऑगस्टपासून दररोज संध्याकाळी ७.३० वाजता भेटायला येणार आहे. दुर्गाने बालपणापासून मोठ्या संघर्षाचा सामना करत खडतर आव्हानांना तोंड दिलंय. पण आता हीच 'दुर्गा' नक्की कोणतं रूप घेणार? 'दुर्गा'च्या रुपात घरात सुख येणार की सूड? प्रेम आणि कर्तव्यात 'दुर्गा' कशाची निवड करणार? या प्रश्नांचं कोडं लवकरच सुटणार आहे. या मालिकेत रूमानी खरे आणि अंबर गणपुले प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच शिल्पा नवलकरही या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकतील.
१४ वर्षांपूर्वी साताऱ्यातील मोठे नेते दादासाहेब मोहितेंमुळे दुर्गाच्या वडिलांनी आत्महत्या केलेली असते. यामुळेच तिची आई मानसिकदृष्ट्या खचून जाते. त्यामुळे 'दुर्गा'ला आयुष्यात मोठा संघर्ष करावा लागतो.'दुर्गा' या पात्राभोवती फिरणारी ही मालिका आहे. तरुण, निडर, महत्वाकांक्षी, पत्रकारितेचं शिक्षण घेऊन त्यात उत्तम करिअर करणारी अशी ही 'दुर्गा' अभिषेकला भेटते. एकमेकांच्या भूतकाळाबद्दल अनभिज्ञ असलेले दुर्गा आणि अभिषेक लग्नबंधनात अडकतात.
लग्नानंतर दुर्गाला हे कळतं की, ज्या दादासाहेब मोहितेंमुळे आपलं आयुष्य बदललं, ज्या कुटुंबाचा आपल्याला सूड घ्यायचा होता त्याच कुटुंबाचा उबंरठा आपण ओलांडला आहे. खरं प्रेम, सत्तासंघर्ष, पैशांसाठीची धडपड या गोष्टींमधून 'दुर्गा' आता कसा मार्ग काढणार? जोडीदाराशी इमान राखणार की वैऱ्याचा प्रतिशोध घेणार? हे प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळेल.