दोन समांतर रेषा कधीही जुळू शकत नाहीत, त्याचप्रमाणे एकमेकांचा तिरस्कार करणारी, भिन्न स्वभावाची दोन माणसं कधीही एकत्र येऊ शकत नाहीत... पण प्रेम अशक्य गोष्ट शक्य करू शकतं असं म्हणतात. पराकोटीच्या तिरस्कारातूनसुद्धा सरतेशेवटी प्रेमाचा अंकुर फुटतो इतकी ताकद प्रेमात असते. ती व्यक्ती समोर आली की नकोशी वाटते पण नजरेआड होताच जीवाची घालमेल होते. सिद्धी आणि शिवाच्या बाबतीत असच काहीसं घडणार आहे. दोघेही एकमेकांचा तिरस्कार करतात, पण नियती आपला डाव खेळतेच. अशी परिस्थिती उदभवते की सिद्धी – शिवा यांना बेसावधपणे लग्नाच्या बंधनात अडकवलं जातं आणि मग कसोटी लागते प्रेमाची. एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या या दोघांमध्ये प्रेम भावना निर्माण होईल का ? तिरस्काराच्या धगधगत्या निखाऱ्यावर शिवा आणि सिद्धीमध्ये प्रेम फुलू शकेल ? सिद्धी आणि शिवा ह्या दोन धगधगत्या निखाऱ्यांच्या नातेसंबंधाची रांगडी प्रेमकथा “जीव झाला येडापिसा” १ एप्रिलपासून सोम ते शनि रात्री ८.०० वा. कलर्स मराठीवर. चिन्मय मांडलेकरने लिहिलेल्या या कथेची निर्मिती पोतडी प्रॉडक्शन्सने केली आहे. मालिकेचे विशेष म्हणजे संपूर्ण मालिका सांगलीमध्ये शूट होणार आहे. नवोदित विदुला चौघुले सिद्धीची भूमिका आणि अशोक फळदेसाई शिवाची भूमिका साकारणार आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, चिन्मयी सुमित देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
रुद्रायत या गावामध्ये मध्यमवर्ग कुटुंबामध्ये वाढलेली सिद्धी गोकर्ण ही स्वाभिमानी, तत्वनिष्ठ आणि जगाच्या चांगुलपणावर खूप विश्वास असलेली मुलगी आहे. “मी विश्वास ठेवणं ही माझी ताकद आणि त्यांनी माझा विश्वास तोडणं हा त्यांचा कमकुवतपणा” असे सिद्धीचे आयुष्याबद्दलचे मत आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवा अत्यंत धडाडीचा, शीघ्रकोपी, बोलण्यापेक्षा कृतीवर विश्वास ठेवणारा असा रांगडा गडी आहे. सिद्धी आणि शिवा दोघेही परस्परविरोधी माणसं कुठल्या परिस्थितीत लग्नबंधनात अडकतात ? एकमेकांबद्दल असं कुठलं सत्य आहे जे दोघांना माहिती नाही ? तिरस्काराचा भडका प्रेमाची ऊब बनून सिद्धी-शिवाला कसं एकत्र आणेल; हा प्रवास बघणं रंजक असणार आहे.
चिन्मय मांडलेकर म्हणाला, “जीव झाला येडापिसा” ही सिद्धी – शिवाची ही गोष्ट आहे. प्रत्येक लग्नामागे एक प्रेमकथा असते परंतु या मालिकेमध्ये मात्र सिद्धी – शिवाचं लग्नच मुळात द्वेषातून होतं. एका घटनेमुळे सिद्धीच्या मनात शिवाबद्दल गैरसमज आणि शिवाच्या मनात सिद्धीबद्दल वितुष्ट निर्माण होत, आणि असे एकेमेकांचा द्वेष करणारे दोघ लग्न बंधनात बांधले जातात. या दोघांचा द्वेषापासून प्रेमापार्यतचा प्रवास म्हणजे ही मालिका. ही मालिका इतर मालिकांपेक्षा दोन गोष्टीमुळे वेगळी आहे एक म्हणजे बऱ्याचदा मालिका नायक – नायिकेच्या अवतीभोवती फिरणाऱ्या असतात यामध्ये इतर पात्र, त्यांच्या भूमिका देखील तितक्याच महत्वाच्या आहेत, दुसरं म्हणजे मालिकेचे संपूर्ण शुटींग सांगलीमध्ये होणार आहे. जेवढी मजा आम्हांला शुटींग करताना येत आहे तितकीच प्रेक्षकांना देखील येईल याची मला खात्री आहे”.