केवळ त्यांचे अघोरी हे नाव जरी घेतले तरी मनात भीती, गूढ प्रश्न निर्माण होतात कारण स्वत:ला समाजापासून दूर राखणा-या या पंथाच्या साधूंबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे. अंगाला राख फासलेले आणि केसांच्या जटा वाढविलेले ते लोक शंकराची स्तुती करणारे मंत्र म्हणत उच्च आध्यात्मिक अनुभूतीसाठी समाजापासून दूरच राहतात. पण एखादा तुमच्या-माझ्यासारखा दिसणारा, सामान्य नोकरी करणारा आणि समाजात मिळून-मिसळून राहणारा माणूसही अघोरी पंथाचा उपासक असू शकतो. प्रेम आणि फसवणुकीचा पदर असलेली आणि अघोरी जगताच्या पार्श्वभूमीवर उलगडत जाणारी ही नवी प्रेमकथा आहे.
आद्विकची भूमिका रंगविणारा अभिनेता गौरव चोप्रा म्हणाला, “अघोरी साधूंच्या विश्वाभोवती अघोरी या मालिकेतील प्रेमकथा गुंफण्यात आली आहे. या प्रेकथेची पार्श्वभूमी ही वैशिष्ट्यपूर्ण आणि आजवर कधी न पाहिलेली आहे. नायकाची प्रमुख भूमिका असल्यामुळे मी आद्विकची भूमिका नाकारू शकलो नाही. एक अभिनेता म्हणून मला नेहमीच प्रयोग करण्यास आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्यास आवडतं. तसंच या मालिकेसारख्या कोणत्याच मालिकेत मी पूर्वी भूमिका साकारलेली नव्हती. प्रेक्षकांना आद्विकची भूमिका पाहायला आवडेल, अशी आशा आहे.”या मालिकेत प्रीती पुरी, पौलोमी दास, झफर राजधानी, मल्हार पंड्या तसेच अन्य नामवंत कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.