कला आणि संस्कृतीचं माहेर घर म्हणजे महाराष्ट्र. विविध कला, संस्कृती आणि साहित्याचा देदीप्यमान वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. महाराष्ट्राच्या नृत्यकलेची ओळख आणि लोकसंस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे "लावणी". मोठ्या डौलाने लावणी आजही रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते आहे. त्यामुळेच कलर्स मराठीवर पुन्हा एकदा ढोलकीच्या तालावर (dholkichya talavar) हा कार्यक्रम सुरु होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा घराघरात ढोलकीचा ताल घुमणार आहे.
येत्या १ जुलैपासून ढोलकीच्या तालावर हा कार्यक्रम सुरु होतोय. या कार्यक्रमात अभिनेत्री क्रांती रेडकर (kranti redkar), दिग्दर्शक,लेखक अभिजीत पानसे(abhijit panse), आणि नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील (ashish patil)हे परिक्षक पदाची जबाबदारी पार पाडणार आहेत. तर, बिग बॉस मराठी ४ चा विजेता अक्षय केळकर (akshay kelkar) या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. ढोलकीच्या तालावर कार्यक्रमाच्या नव्या पर्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून असंख्य मुलींनी आपल्या लावणीचे व्हिडिओ पाठवले असून त्यातून काही निवडक मुलींची या कार्यक्रमात निवड झाली आहे.
"मी खूप उत्सुक आहे मी कार्यक्रमाचा भाग आहे. कारण कुठेतरी नृत्य ही माझ्या हृदयाच्या खूप जवळची अशी गोष्ट आहे. त्यामुळे येणारे जे स्पर्धक आहेत त्यांची तयारी बघण्यात आणि त्यांच्याबरोबरचा प्रवास त्यांच्यासोबत साध्य करण्यात माझा कल जास्त आहे. मी जरी परीक्षकाच्या भूमिकेत असले तरीदेखील मी त्यांची सपोर्टर असेन. त्या खुर्चीवर मला एक माणूस म्हणून बसायला जास्त आवडेल जेव्हा त्यांना माझी गरज असेल तेव्हा मी तिथे कायम असेन. मी स्वत: कथ्थक नृत्यांगना असल्याने अदाकारी, क्लासिकलची बाजू, टेक्निकल गोष्टींकडे देखील मी लक्ष ठेवणार आहे. सांस्कृतिकदृष्ट्या समृध्द असा हा कार्यक्रम आम्ही प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहोत मला खात्री आहे तुम्हाला देखील आवडेल,” असं क्रांती म्हणाली.
"एक सामान्य माणूस ते इथपर्यंतचा प्रवास खूपच सुंदर आणि खूप काही शिकवणारा होता आणि अजूनही आहे. एक कलाकार, मग एक स्पर्धक, मग कोरिओग्राफर, ते आज परीक्षक हा प्रवास हा फक्त एक स्वप्नवत क्षण आहे. लोककला प्रकार (लावणी) ला गेले १८ वर्षांपासून मी जपून ठेवले आहे जितका आनंद तो सादर करताना होतो तितकाच परीक्षकाच्या खुर्चीत बसून देखील होतो आहे. ज्या शोचा मी सलग २ सीझनचा विजेता कोरिओग्राफर ठरलो आज त्याच शोचा मी परीक्षक आहे, ही माझ्यासाठी खुप मोलाची आणि अभिमानाची बाब आहे", असं आशिष पाटील म्हणाला. दरम्यान, ढोलकीच्या तालावर हा कार्यक्रम येत्या १ जुलैपासून सुरु होणार आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी रात्री ९ वाजता हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येईल.