झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'तुला पाहते रे'मध्ये आता नवीन ट्विस्ट आला आहे. इतके दिवस ईशा निमकरला पडलेले स्वप्न खरे आहे की खोटे, याचा उलगडा होत असताना आता राजनंदिनीचा पुनर्जन्म ईशा असल्याचे नुकताच प्रसारीत झालेल्या भागात सिद्ध झाले आहे.
तुला पाहते रे मालिकेत गेल्या काही दिवसांत प्रसारीत झालेल्या भागांमध्ये ईशा निमकरला राजनंदिनीचा विक्रांत सरंजामे जीवनात आल्याचा काळ स्वप्नात दिसला. त्यानंतर ईशाला आपणच राजनंदिनी असल्याचे वाटू लागते. घडलेला सगळा प्रकार ती तिच्या आई वडिलांना सांगते. पण त्यांना ईशाला वेड लागल्यासारखे वाटू लागते. ते तिला मानसोपचारतज्ज्ञांकडे नेतात. तिथे रिसेप्शनवर असलेले माने ईशाला पडलेल्या स्वप्नात दिसलेले असतात. दादासाहेबांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट घेऊन घरी तेच आलेले असतात. ईशा त्यांना पंचवीस वर्षांपूर्वीची घडलेली ही गोष्ट सांगते. पण, त्यावेळी त्यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट खोटा बनवल्यामुळे ते घाबरतात आणि ईशा बोलते त्यात तथ्य नसल्याचे सांगतात.
ईशा डॉक्टरांकडून गेल्यानंतर ते डॉक्टरांकडे पंचवीस वर्षांपूर्वी घडलेली ही गोष्ट ईशाने सांगितली ती खरी असल्याचे माने सांगतो. त्यानंतर डॉक्टरही चक्रावून जातात. डॉक्टर ईशाला पुर्नजन्म वगैरे नसतो. जर तुला असे वाटत असेल तर तू ते पुराव्यांसोबत सिद्ध कर सांगतात. ईशा पुरावे गोळा करण्यासाठी सरंजामे बंगल्यात जाते. तिथे गेल्यामुळे घरातील सगळे खूश होतात. विक्रांत लंडनला गेल्यामुळे ईशाला पुरावे शोधण्यात अडचण देखील नसते.
त्यामुळे आता ईशा विक्रांतला धडा कसा शिकवणार आणि झेंडे ईशाचा सामना कसा करणार, हे पुढील भागांमध्ये पहायला मिळणार आहे.