'हसताय ना? हसायलाच पाहिजे' हा नवीन विनोदी कार्यक्रम लवकरच कलर्स मराठीवर सुरु होतोय. 'चला हवा येऊ द्या' संपल्यानंतर निलेश साबळे (Nilesh Sabale), भाऊ कदम (Bhau Kadam) आता या नव्या शोमध्ये झळकणार आहे. तर त्यांच्या सोबतीला ओंकार भोजनेही आहे. नुकताच कार्यक्रमाचा एक प्रोमो रिलीज झाला. यात भाऊ कदम आणि ओंकार भोजनेला साडीत पाहून नेटकऱ्यांची निराशा झाली. पुन्हा तोचतोचपणा म्हणत शोवर टीका झाली. यावरुन साबळेंनाही ट्रोल करण्यात आलंय. तर त्याला निलेश साबळेंच्या पत्नी गौरी साबळेने (Gauri Sabale) उत्तर दिलं. नेटकरी विरुद्ध गौरी साबळे असं वॉरच सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' चा पहिला प्रोमो पोस्ट केला गेला. यानंतर लोकांनी या शोवर नाराजीच दर्शवली. काहीतरी वेगळं अपेक्षित असताना पुन्हा 'चला हवा येऊ द्या'सारखंच तोचतोचपणा असल्याची टीका नेटकऱ्यांनी केली. त्यात भाऊ कदम, ओंकार भोजनेला साडीत पाहून प्रेक्षक संतापले. काही नेटकऱ्यांनी थेट साबळेंनाच साडी घालण्याचं आव्हान दिलं. तसंच ओंकार भोजनेसारख्या टॅलेंटेड विनोदी कलाकारालाही साडी नेसवली म्हणत साबळेंवरच नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला. 'चांगला कॉमेडियन होतास तू, मीच तुला साडी नेसायला लावली' असं एक मीमही व्हायरल झालं.
या सर्व ट्रोलिंगवर निलेश साबळेंची पत्नी गौरी साबळेने ट्रोलर्सला उत्तर दिलं. तिने कमेंट करत लिहिले, "साडी नेसली ती पात्राची गरज म्हणून. तू जर कलाकार असतास तर तुला कळलं असतं पण सगळ्यांना परमेश्वर ती कला देत नाही. विनोद पाहून हसायचं असतं आणि आनंद घ्यायचा असतो. त्याची चिरफाड करुन त्यानं दुसऱ्याला त्रास देणं हा विकृत आनंद आहे. दादा तू सुद्धा प्रसिद्धीसाठी त्याच्याच पोस्ट तयार करुन टाकतोयस यातच त्याचं यश आलं. दुसऱ्याला नावं ठेवणारा कधीही मोठा होत नाही. "
तरीही निलेश साबळेंच्या या नवीन शोला नेटकऱ्यांनी धारेवरच धरलं आहे. याजागी बिग बॉस सुरु करा अशाही कमेंट आल्या आहेत. 7 एप्रिलपासून संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर शो प्रसारित होणार आहे.