Join us

"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 4:18 PM

"कपिल शर्मा शोची कॉपी केली कारण...", निलेश साबळेने स्पष्टच सांगितलं

'चला हवा येऊ द्या' हा टीव्हीवरील गाजलेला कॉमेडी शो. तब्बल १० वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करून या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या शोला प्रचंड लोकप्रियता आणि प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. अभिनेता निलेश साबळे या शोचं सूत्रसंचालन करायचाय. पण, सुरुवातीपासूनच हा शो हिंदीतील 'द कपिल शर्मा शो'ची कॉपी असल्याचं म्हटलं जात होतं. यावर आता निलेश साबळेने स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे. 

झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' हा शो हा द कपिल शर्मा शोची कॉपी असल्याचा खुलासा निलेश साबळेने एका मुलाखतीत केला आहे. "रिएलिटी शोचा हा फॉरमॅट मला आवडतो. बरेच जण म्हणतात की तुम्ही कपिलची कॉपी केली. यावर मी सांगू इच्छितो की होय. कपिल शर्मा शोची कॉपी केली. पण, चांगल्या गोष्टींची कॉपी करण्यात वाईट काय? कारण, हे मला सुचलं असं मी कधीच म्हणणार नाही. एकदा मी झाडाखाली बसलो, मला असं वाटलं चला हवा येऊ द्या शोचा असा फॉरमॅट बनवूया...असं मी कधीच म्हणणार नाही. कपिलने केलेलं मला करावंसं वाटलं. आणि याचं कारण होतं लय भारी सिनेमा," असं निलेश साबळे तारांगणला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.  

"रितेश सरांनी तेव्हा मला कपिल शर्माचा जसा पूर्णवेळ प्रमोशनचा शो आहे. तसा तुम्ही करू शकता का? कारण, डान्स शोमध्ये आम्ही प्रमोशन करतो. पण, त्याचा वेळ फारच कमी असतो. तर पूर्णवेळ सिनेमा किंवा नाटकाचं प्रमोशन करणारा सिनेमा तुम्ही करू शकता का? असं त्यांनी सुचवलं होतं. आणि त्यातूनच हा शो निर्माण झाला होता. गेल्या १० वर्षांत मराठी सिनेमा आणि नाटकांना या शोचा खरंच खूप फायदा झाला. या शोमुळे नाटकाचं बुकिंग वाढलं, असं स्वत: लोक मला सांगतात. जर यातून इंडस्ट्रीचा फायदा होणार असेल. आणि प्रेक्षकांना काहीतरी चांगलं बघायला मिळणार असेल तर ते मी केलं पाहिजे," असंही त्याने सांगितलं. 

'चला हवा येऊ द्या' बंद झाल्यानंतर निलेश साबळेने आता वेगळी वाट धरली आहे. कलर्स मराठीवरील 'हसताय ना हसायलाच पाहिजे'मधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कॉमेडी शोमधून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. 

टॅग्स :निलेश साबळेचला हवा येऊ द्याकपिल शर्मा