Join us

निलेश साबळेनं सांगितला शाहरुख खानचा 'तो' कानमंत्र! म्हणाला, 'एवढा मोठा माणूस जेव्हा..'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 13:39 IST

एक खास गोष्ट सांगतं निलेश साबळेने अभिनेता शाहरुख खानचं कौतुक केलं.

'चला हवा येऊ द्या' संपल्यानंतर निलेश साबळे (Nilesh Sabale), भाऊ कदम (Bhau Kadam) आणि ओंकार भोजने आता नव्या शोमध्ये झळकणार आहे. त्यांचा 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' हा नवीन विनोदी कार्यक्रम लवकरच कलर्स मराठीवर सुरु होतोय. नुकत्याच 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत डॉ. निलेश साबळेनेभाऊ कदम आणि ओंकार भोजनेचं भरभरुन कौतुक केलं. यावेळी त्यानं शाहरुखची एक खास गोष्ट या कलाकारांमध्ये दिसून येत असल्याचं त्यानं सांगितलं. 

लोकमत फिल्मीशी बोलताना निलेश साबळे म्हणाला, 'किंग खान शाहरुखचं एक खूप चांगलं वाक्य मी ऐकलं होतं. शाहरुख म्हणाला होता, जेव्हा मी एखाद्या सेटवर जातो. तेव्हा मी स्व:ताला भाड्यानं देतो. फराह खान माझी मैत्रिण आहे, ठीक आहे. पण, जेव्हा मी तिच्या सेटवर जातो. तेव्हा जर माझा ९ चा कॉल टाइम असेल, तर तिथून पुढे मी स्वत:ला भाड्याने दिलंय. तेव्हा तिनं मला १०० वेळा नाचवावं किंवा २०० वेळा उड्या मारून घ्याव्यात, मी प्रश्न विचारत नाही. फक्त माझ्या पॅकअपच्या वेळेला तिनं मला सोडावं. एवढा मोठा माणूस जेव्हा अशी भूमिका घेतो तेव्हा खरंच ही मोठी गोष्ट असते. हेच मला भाऊ कदम आणि ओंकारच्या बाबत जाणवलं आहे'. 

ओंकार भोजनेबद्दल बोलताना निलेश म्हणाला, 'मी याआधी ओंकार भोजनेबरोबर काम केलेलं नाहीये. पण, मी प्रेक्षकांना एवढंच सांगू इच्छितो की, जे तुम्ही आजवर भाऊकडून अनुभवलंय अगदी तसंच काम ओंकार भोजनेसुद्धा करतो आहे. त्याचा चाहतावर्ग आधीच खूप मोठा आहे. पण, त्यात निश्चित अजून वाढ होणार आहे. कारण, आता ओंकारचं एक वेगळंच रुप तुम्हाला या 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' या कार्यक्रमात बघायला मिळणार आहे'. तसेच सर्वांची खूप छान जोडी जमल्याचंही त्यानं सांगितलं. 

'हसताय ना? हसायलाच पाहिजे' हा विनोदाचा अ‍ॅटमबॉम्ब 'कलर्स मराठी' वाहिनीवरील आता २७ एप्रिलपासून सुरू होणार आहे. शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या खास कार्यक्रमात अभिनेते भरत जाधव आणि ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल आठल्ये हे दोन महान कलाकार दर भागामधे सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी लाभणार आहेत. 

टॅग्स :निलेश साबळेसेलिब्रिटीशाहरुख खानभाऊ कदमकलर्स मराठी