पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या पर्वाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आगामी भागात प्रेक्षकांना विनोदाची परिपूर्ण मेजवानी मिळणार आहे.
एकीकडे वन शॉटमध्ये सीन शूट करण्याच्या दरम्यान, दिग्दर्शकाकडून कलाकाराला डायलॉग नेमका कसा बोलला गेला पाहिजे हे सांगताना उडणारी धमाल आणि त्यानंतर कलाकाराचे झालेले कनफ्युझन यामुळे हास्य कल्लोळ माजेल हे नक्की. तर दुसरीकडे मुलाखती दरम्यान, ‘निलांबरी’ या एका साध्या-सोप्या नावातून निळू भाऊ, निल आर्मस्ट्राँग अशी नावे चुकून उच्चारली जाणे म्हणजे आत्मविश्वास कमी असल्याचे लक्षण आहे. प्रत्येकामध्ये न्युनगंड असतो, त्यावर मात करुन आपण यशस्वी व्हायला हवे, असे निलांबरी यांचे म्हणणे प्रेक्षकांना किती हसवते हे पुढील आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.आठवड्यातील चार दिवस प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज असणाऱ्या या दुसऱ्या पर्वाचे दोन वेगळे फॉरमॅट आहेत. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीचे जहागिरदार’ हा फॉरमॅट असून महेश कोठारे या दोन दिवसांचे परफॉर्मन्सचे परीक्षण करणार आहेत. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी समीर चौघुले, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे, अरुण कदम आणि अंशुमन विचारे हे सहा सेलिब्रिटी कलाकार आणि ८ नवीन विनोदी कलाकार एकत्र परफॉर्मन्स करणार आहेत. आणि या दुसऱ्या पर्वाच्या शेवटी महेश कोठारे दोन ‘कॉमेडीचे जहागिरदार’ ठरवणार आहेत.मंगळवारनंतर मनोरंजनाची गाडी चालू ठेवत सर्व कलाकार मंडळी बुधवार आणि गुरुवारला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा- रथी महारथींचा हास्यकल्लोळ’ करणार आहेत. कार्यक्रमाच्या या दुसऱ्या सेलिब्रिटी फॉरमॅटमध्ये सुप्रसिद्ध विनोदी कलाकार आणि या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाचे विजेते या दोन दिवसांत स्किट सादर करणार आहेत. या फॉरमॅटचे परीक्षण सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक करणार असून ‘परफॉर्मर ऑफ दि विक’ देखील तेच निवडणार आहेत. या फॉरमॅटमध्ये सेलिब्रिटी जोडी समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर आणि संदीप गायकवाड, अरुण कदम, श्याम राजपुत आणि सुलेखा तळवळकर, अंशुमन विचारे, रोहित चव्हाण आणि रसिका वेंगुर्लेकर, गौरव मोरे आणि वनिता खरात, श्रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवलकर अशी असणार आहे. तसेच, होस्ट आणि दोस्त असलेली प्राजक्ता माळी पुन्हा एकदा तिच्या नटखट स्वभावाने या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहे.