कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोक-या गेल्या, व्यापार-धंदे ठप्प पडलेत. अगदी मनोरंजन विश्वही याला अपवाद नाही. कोरोना काळात मोठ्या कलाकारांचे निभावले. पण लहान कलाकार व इंडस्ट्रीत रोजंदारीने काम करणा-या कामगार-तंत्रज्ञांना मात्र जोरदार फटका बसला. हाताला काम नसल्याने अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. टीव्हीवरचा ‘हनुमान’ अर्थात हनुमानाची भूमिका साकारणारा अभिनेता निर्भय वाधवा (Nirbhay Wadhwa) यापैकीच एक.
कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आणि निर्भयला काम मिळेनासे झाले. परिणामी गेल्या दीड वर्षांपासून निर्भय बेरोजगार आहे. कामच नसल्याने पैसा कुठून येणार. जवळते होते नव्हते तेवढे पैसे दैनंदिन गरजा भागवण्यात संपले आणि त्यानंतर निर्भयच्या अडचणी आणखी वाढल्या. अखेर पैशांसाठी निर्भयला त्याची आवडती बाईक विकावी लागली. (Nirbhay Wadhwa sold his sports bike because of financial crises)
एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने आपबीती सांगितली. गेल्या दीड वर्षापासून माझ्याकडे काहीही काम नाही. लॉकडाऊनमध्ये माझी बचत संपली आणि माझ्यावर बाईक विकण्याची वेळ आली. मला अॅडव्हेंचर आवडतात. यासाठी मी एक सुपर बाईक खरेदी केली होती. पैशांसाठी मला माझी ही बाईक विकण्याचा निर्णय घ्यावा लागला. हा निर्णय कठीण होता. अगदी एक एक पैसा गोळा करून मी मोठ्या हौसेने ही सुपर बाईक विकत घेतली होती. मात्र नाईलाजाने मला बाईक विकावी लागली. मी ती बाईक 22 लाखांना विकत घेतली होती. तिचे तेवढे पैसे मिळणार नव्हते. अखेर एका कंपनीला 9 लाखांना मी बाईक विकली. त्या बाईकसोबत माज्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या होत्या, असे निर्भयने सांगितले.
अर्थात आता परिस्थिती थोडी बदलली आहे. लवकरच निर्भय विघ्नहर्ता गणेश या मालिकेत हनुमानाची भूमिका साकारताना दिसणार आहे. याआधी ‘संकट मोचन महाबली हनुमान’ या मालिकेत तो दिसला होता. निर्भयने महाभारत मालिकेमध्ये दु:शासनाची भूमिका साकारली होती. याशिवाय कयामत की रात या मालिकेत कालासूर ही भूमिका साकारली होती.