Join us

‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’च्या सेटवर निशांतला मिळाली 'ही' कंपनी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 6:30 AM

या मालिकेच्या आगामी भागांमध्ये गुड्डन तिच्या नव्या ‘काठोर’ या साथीदारासोबत, म्हणजे एका कबुतरासोबत, दिसेल. ती तिची जवळची मैत्रीण बनते.

ठळक मुद्देनिशांतला प्राण्यांची आवड असून त्याला या कबुतरांचा लळा लागला आहे

‘झी टीव्ही’वरील ‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’ मालिकेच्या यशामुळे त्यात अक्षत जिंदालची भूमिका साकारणाऱ्या निशांतसिंह मलकाणीचे नाव घराघरात पोहोचले आहे. लवकरच गुड्डन (कनिका मान) आणि अक्षत यांच्यात मोठा संघर्ष होणार आहे. त्यामुळे मालिकेच्या कथानकात नवे नाट्य निर्माण होऊन त्याला नवी कलाटणी मिळणार आहे. या नाट्यात आता आणखी दोन पात्रांची भर पडली असून ती आहेत दोन पांढरी शुभ्र गोजिरवाणी कबुतरे… या कबुतरांनी निशांतसिंहला वेड लावले असून त्यांची भूमिका संपल्यावर त्यातील एका कबुतराला निशांत आपल्या घरी नेणार आहे.

निशांतला प्राण्यांची आवड असून त्याला या कबुतरांचा लळा लागला आहे. आता चित्रीकरणानंतरचा वेळ तो या कबुतरांभोवतीच असतो. त्याने या कबुतरांना मसकली म्हणायला सुरुवात केली आहे. त्यांचे मालिकेतील काम संपल्यावर त्यांच्याशी होणारी ताटातूट आपल्याला सहन होणार नाही, हे लक्षात आल्यावर त्याने या कबुतरांना पाळण्याची सूचना केली. 

निशांत सांगतो, “मला प्राणी आणि पक्ष्यांची प्रचंड आवड आहे. मनावरचा ताण हलका करण्यात त्यांचा कोणी हात धरू शकत नाही. मला त्यांना पाहात राहायला आवडतं. मी जेव्हा सर्वप्रथम मसकलीला पाहिलं, तेव्हा माझ्या नजरेत तिचे चमकदार डोळे भरले आणि मी तिच्या प्रेमात पडलो. खरं म्हणजे ती अतिशय जागरूक, दक्ष आणि चौकस असून ती माझ्या प्रत्येक हालचालीला प्रतिसाद देत असते. मला आता तिचा फार लळा लागला आहे. आता तिचं चित्रीकरणाचं काम संपल्यावर मला तिला घरी घेऊन जायचे आहे, अशी विनंती मी आमच्या टीमला केली. माझ्या घरचे सर्वजण तिच्या स्वागतास उत्सुक आहेत.”

या मालिकेच्या आगामी भागांमध्ये गुड्डन तिच्या नव्या ‘काठोर’ या साथीदारासोबत, म्हणजे एका कबुतरासोबत, दिसेल. ती तिची जवळची मैत्रीण बनते. तसेच काही परिस्थितीमुळे अक्षत आणि गुड्डन हे एकमेकांजवळ येतात. त्यानंतर पर्व (रीहान रॉय) आणि दत्ता  या आपल्या सर्वात मोठ्या शत्रूंविरोधात गुड्डन उभी राहिल्यामुळे मालिकेच्या कथानकात नवा थरारक नाट्यपूर्ण अध्याय सुरू होईल. गुड्डनचे अपहरण करण्यात येते आणि या दोघांकडून तिचा छळ केला जातो. अक्षत तिला शोधण्यासाठी जंग जंग पछाडतो. खूप उशीर होण्यापूर्वी अक्षत गुड्डनला शोधण्यात यशस्वी होईल काय?

टॅग्स :गुड्डन तुमसे ना हो पायेगा