‘झी टीव्ही’वरील ‘गुड्डन…तुमसे ना हो पाएगा’ या मालिकेत अक्षत जिंदलची भूमिका साकारणारा निशांतसिंह मलकाणी हा वैयक्तिक जीवनातही असेच वाजतगाजत लग्न करण्याची अपेक्षा ठेवून आहे. या मालिकेत त्याचे लग्न होत असून या दिमाखदार सोहळ्यात खऱ्याखुऱ्या लग्नाचा अनुभव घेण्यास निशांतसिंह मलकाणी उत्सुक झाला होता; पण त्याच्या दुर्दैवाने त्याला हा अनुभव घेता येणार नाही. कारण मालिकेतील त्याच्या व्यक्तिरेखेच्या स्वभावाला धरून नसल्याने मालिकेत त्याला बॅण्डबाजाविनाच लग्नास हजर राहावे लागणार आहे!
या मालिकेतील लग्नात बाकी सर्व सोहळा संगीत सुरू असताना केवळ नवरदेवालाच बॅण्डबाजाविना लग्नास यावे लागणार असल्याचे समजल्याने निशांतसिंह काहीसा नाराज झाला आहे. वास्तविक जीवनात निशांतसिंह अजून अविवाहित असला, तरी आपणही इतरांसारखेच बॅण्डबाजाच्या आवाजात आणि बारातींच्या नाचगाण्यांसह घोड्यावर बसून विवाहमंडपात यावे, अशी स्वप्ने तो पाहात होता. पण या मालिकेत अक्षतची व्यक्तिरेखा ही कठोर स्वभावाच्या व्यक्तीचीअसल्याने तो कोणताही गाजावाजा न करता चालतच लग्नमंडपात येतो, असे दाखविण्यात येणार आहे. यासंदर्भात निशांतसिंह म्हणाला, “मला माझं लग्न हे अशाच थाटामाटात व्हावं असं वाटत होतं. मालिकतील गुड्डन आणि माझं लग्नही भव्य पध्दतीने आणि झोकात लावलं जाईल, असं मला सांगण्यात आलं होतं. त्यामुळे निदान पडद्यावरील लग्नात तरी मी बॅण्डबाजाच्या गजरात आणि बारातींच्या समवेत घोड्यावर बसून लग्नमंडपात येईन, अशी माझी अपेक्षा होती. मालिकेतील लग्न म्हणजे माझ्या वास्तव जीवनातील लग्नाची रंगीत तालीमच असेल, असा माझा अंदाज होता. पण अक्षतच्या कठोर स्वभावामुळे तो अशा वायफळ खर्चाला कात्री लावून थेट चालत मंडपात येतो, असं पटकथेत दाखविण्यात आलं आहे. परंतु माझ्या वास्तव जीवनातील लग्नात बॅण्डबाजाच्या तालावर बाराती नाचतील आणि मीही सजविलेल्या घोड्यावर बसून झोकात लग्नमंडपात प्रवेश करीन, हे नक्की.”