श्रीकृष्ण या भूमिकेचा विचार केल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या समोर केवळ एकच अभिनेता येतो. तो म्हणजे नितिश भारद्वाज... बी. आर. चोप्रा यांच्या महाभारतने प्रेक्षकांचे प्रचंड मन जिंकले होते. ही मालिका आज इतक्या वर्षांनी देखील प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. ही मालिका सुरू असताना त्या काळात लोक घराच्या बाहेर देखील पडायचे नाहीत. सध्या देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असल्याने दूरदर्शनवर महाभारत ही प्रेक्षकांची आवडती मालिका पुन्हा एकदा दाखवली जात आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. या मालिकेत नितिश भारद्वाज यांनी कृष्णाची भूमिका साकारली होती. त्यांचा अभिनय, त्यांचे हास्य याच्या प्रेक्षक अक्षरशः प्रेमात पडले होते. या मालिकेनंतर नितिश यांना लोक कृष्ण मानून त्यांच्या पाया पडण्यासाठी रांगा लावत असत.
नितिश यांना श्रीकृष्ण या भूमिकेमुळे लोकप्रियता मिळाली असली तरी या मालिकेत नितिश श्रीकृष्ण नव्हे तर विदुरच्या भूमिकेत दिसणार होते. हिंदुस्तान टाईम्सला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, मला विदुर या भूमिकेसाठी मालिकेत घेण्यात आले होते. मी चित्रीकरणासाठी स्टुडिओमध्ये गेलो आणि माझा मेकअप करत होतो. त्यावेळी विरेंद्र राझदानने मला येऊन सांगितले की, या मालिकेत विदुरची भूमिका तो साकारत आहे. त्यावर मी रवी चोप्रा यांना विचारले असता त्यांनी मला सांगितले, तू केवळ 23-24 वर्षांचा आहेस... काहीच भागांनंतर विदुर या मालिकेत वृद्ध झाल्याचे दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे ही भूमिका तू साकारू नये असे आम्हाला वाटते. त्यानंतर या मालिकेतील नकूल अथवा सहदेव ही भूमिका मी साकारावी असे त्यांनी मला सुचवले. पण त्यापेक्षा मला अभिमन्यू साकारायला आवडेल असे मी त्यांना सांगितले. त्यामुळे अभिमन्यूची मालिकेत एंट्री होईल त्यावेळी आपण तुझा विचार करूया असा आमच्यात संवाद झाला आणि मी माझ्या मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र झालो. मी कोल्हापूरला चित्रीकरण करत असताना माझ्या आईने मला फोन करून सांगितले की, गुफी पेंटर यांचा फोन आला होता आणि तुला श्रीकृष्ण या भूमिकेच्या स्क्रीन टेस्टसाठी त्यांनी बोलावले आहे. पण या भूमिकेसाठी मी योग्य नाही असे माझे म्हणणे असल्याने मी त्याकडे दुर्लक्ष केले. कोल्हापूरचे चित्रीकरण झाल्यानंतर मी रवी बिस्वास यांना किस्से मियाँ बिवी के या कार्यक्रमासाठी असिस्ट करत होतो. त्यावेळी बी.आर.चोप्रा मला भेटले आणि त्यांनी मला चांगलेच सुनावले. मी श्रीकृष्ण या भूमिकेच्या स्क्रीन टेस्टला येणे का टाळत आहे हे त्यांनी मला विचारले त्यावर या भूमिकेसाठी तुम्हाला एखाद्या अनुभवी कलाकाराची गरज आहे. माझ्यासारख्या नवीन व्यक्तीचा तुम्ही या भूमिकेसाठी विचार तरी कसे करू शकता असे मी त्यांना विचारले. त्यावर तू स्क्रीन टेस्ट तरी दे... पुढचे आपण पाहूया असे त्यांनी मला सुचवले आणि अशाप्रकारे महाभारतातील सगळ्यात महत्त्वाच्या भूमिकेसाठी माझी निवड झाली.
नितिश यांनी महाभारतानंतर अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले. पण आजही प्रेक्षक त्यांना कृष्ण म्हणूनच ओळखतात. नितिश यांची लोकप्रियता प्रचंड वाढल्यानंतर त्याला भारतीय जनता पार्टीकडून लोकसभेचे तिकीट देखील देण्यात आले होते. नितिश जमशेदपूर येथून निवडून देखील आले आणि खासदार बनले. पण त्यांनी काहीच काळात राजकारणाला रामराम ठोकला.
नितिश यांनी आपल्या अभिनयकारकिर्दीची सुरुवात मराठी रंगभूमीवरून केली होती. त्यानंतर ते रवी बासवानीसोबत हिंदी नाटकांमध्ये काम करू लागले. त्यांनी दूरदर्शनवर न्यूज अनाऊन्सरची नोकरी देखील केली आहे. त्यांनी 1987 ला खट्याळ सासू नाठाळ सून या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत एंट्री केली. त्यानंतर त्यांनी तृषाग्नी या हिंदी चित्रपटात काम केले. पण श्रीकृष्ण या भूमिकेने त्यांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्यानंतर त्यांनी अनेक धार्मिक मालिकांमध्ये काम केले. या मालिकांना प्रेक्षकांची पसंती देखील मिळाली.