Join us

'मला श्रीकृष्ण, स्वत:ला मीरा समजून महिला करतात मेसेज', नितीश भारद्वाज यांनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2023 4:30 PM

गोकुळाष्टमीचा विषय निघाला की नितीश भारद्वाज यांची आठवण होतेच.

'महाभारत' मालिकेचा प्रेक्षकांवर मोठा प्रभाव आहे. यातील पात्र चाहत्यांना खरोखरंच ईश्वरासमान वाटायचे. आजही मालिकेतील कलाकार समोर आले तर लोक त्यांच्यात देवच बघतात इतकं त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. महाभारत मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज (Nitish Bharadwaj) यांनी गोकुळाष्टमीच्या आठवणी ताज्या केल्या. 

गोकुळाष्टमीचा विषय निघाला की नितीश भारद्वाज यांची आठवण होतेच. त्यांनी या सणाविषयी आठवणी सांगताना अनेक गोष्टींचा उल्लेख केला. ते म्हणाले, 'मला आठवतंय काही वर्षांपूर्वी मी गोकुळाष्टमीला वृंदावनात गेलो होतो. तिथे मी स्थानिक लोकांसोबत नृत्य केलं. आम्ही डान्समध्ये इतके मग्न झालो की तीन तास झाल्याचंही मला कळलं नाही. परम आनंद काय असतो याचा प्रत्यय मला तेव्हा आला. हे तेव्हाच घडतं जेव्हा आपण स्वत:ला विसरुन श्रीकृष्णाच्या भक्तीत न्हाऊन जातो.'

मीरा बनून मुली मेसेज करतात

चाहत्यांच्या आलेल्या अनुभवाविषयी नितीश म्हणाले,'मला स्वत:चं कौतुक करायला आवडत नाही. मी स्वत:ला खूप नशीबवान समजतो की मला लोकांचं इतकं प्रेम मिळालं. आजच्या कलियुगात लोकांचा विश्वास जिंकणं अवघड आहे. लोक माझ्यावर नि:स्वार्थपणे प्रेम करतात. आजही त्यांना माझ्यात श्रीकृष्णाची झलक दिसते.आजच्या मटेरिअलिस्टिक जगातही कित्येक महिला मीरा बनून मला इन्स्टाग्रामवर मेसेज करतात. त्या मला श्रीकृष्ण समजतात आणि स्वत:ला मीरा समजतात. हे कमाल आहे.'

मोठ्या शहरात आता दहीहंडीचं बाजारीकरण झालं आहे. सणांची खरी मजा तर छोट्या शहरात बघायला मिळते. कृष्णाची भूमिका केल्यानंतर मी नंतर मी कधीच निगेटिव्ह पात्र साकारलं नाही असंही ते म्हणाले.

टॅग्स :महाभारतटिव्ही कलाकारसोशल मीडिया