ज्येष्ठ अभिनेते नितीश भारद्वाज 'महाभारता'त कृष्णाची भूमिका साकारून घराघरात पोहोचले. सध्या त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे ते चर्चेत आले आहेत. भारद्वाज यांनी त्यांच्या पत्नीविरोधात मानसिक अत्याचार केल्याची तक्रार केली होती. मुलांनाही भेटू दिलं जात नसल्याचा आरोपही त्यांनी पत्नीवर केला होता. त्यानंतर त्यांची IAS पत्नी स्मिता भारद्वाज यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्मिता भारद्वाज यांनी नितीश यांच्याबाबत अनेक खुलासे केले आहेत.
नितीश भारद्वाज यांच्या आरोपांनंतर IAS स्मिता भारद्वाज यांनी 'फ्री प्रेस जनरल'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी नितीश भारद्वाज यांच्यावर आरोप केले आहेत. नितीश यांनी जॉब सोडण्यास सांगितलं असल्याचं त्यांनी या मुलाखतीत सांगितलं. तसंच जॉब सोडण्यास नकार दिल्यामुळे त्यांनी घटस्फोटाचा पर्याय निवडल्याचा खुलासाही नितीश भारद्वाज यांच्या पत्नीने केला आहे. IAS स्मिता भारद्वाज म्हणाल्या, "मी जॉब सोडावा असं नितीशचं म्हणणं होतं. जेव्हा मी त्याचं म्हणणं ऐकलं नाही तेव्हा त्याने घटस्फोटाचा निर्णय घेतला. आणि जेव्हा मी घटस्फोट घेण्यासाठी तयार झाले. तेव्हा त्याने माझ्याकडे संमतीने घटस्फोट घेण्यासाठी पैसे मागितले. मी या गोष्टीला विरोध करताच त्याने आता विक्टिम कार्ड काढलं आहे."
मुलांना भेटू देत नसल्याचे नितीश भारद्वाज यांचे आरोपही स्मिता यांनी फेटाळून लावले. "१३ फेब्रुवारीला नितीशने मुद्दाम मुलांना भेटण्याचं टाळलं. आणि त्यानंतर १४ फेब्रुवारीला त्याने पत्रकार परिषद घेतली. त्यात त्याने माझ्यावर आरोप करत मी मुलांना भेटू देत नसल्याचं सांगितलं. १७ फेब्रुवारीला आमच्या मुलीला तो भेटला. तेव्हा आमचे काही नातेवाईक आणि पोलीस अधिकारीदेखील होते. जवळपास ३० मिनिटे तो आमच्या घरी होता. मुलांच्या जन्मापासून त्याने त्यांच्या संगोपनाचा कोणताच खर्च उचललेला नाही. त्याने कधीच मुलांच्या शाळेची फी देखील भरलेली नाही," असंही त्या पुढे म्हणाल्या.
नीतीश भारद्वाज यांनी तक्रारीत असेही म्हटले की, २०१८ मध्ये त्यांनी आणि पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. कायदेशीर प्रक्रिया अद्याप सुरु असुनही त्यांच्यापासून दूर गेलेली त्यांची पत्नी आपल्या जुळ्या मुलींना भेटू देत नाही. मुंबई फॅमिली कोर्टातही त्यांनी लेखी तक्रार केली आहे. नीतीश भारद्वाज आणि स्मिता यांच्या लग्नाला १२ वर्ष झाली होती आणि २०१८ मध्ये त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.अद्याप त्यांचा घटस्फोट झाला नसून कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे.