Join us

"त्याची नोकरी परदेशात, तो तिथे सेटल...", लाडका लेक अनिकेतबद्दल काय म्हणाल्या निवेदिता सराफ ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 12:08 IST

निवेदिता यांचा मुलगा अनिकेत सराफ हा एक उत्तम शेफ आहे.

अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडपं आहे. आता या दोघेही छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. अशोक सराफ हे 'अशोक मा. मा.' या मालिकेतून तर निवदिता सराफ या 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेत झळकणार आहेत.  या मालिका आईबाबा आणि मुलं यांच्या नात्यावर भाष्य करण्यात येणार असल्याचं प्रोमोमधून पाहायला मिळत आहे. तर यातच आता निवेदिता सराफ या त्यांचा मुलगा अनिकेत सराफ याच्याबद्दल व्यक्त झाल्या. 

निवेदिता यांचा मुलगा अनिकेत सराफ हा एक उत्तम शेफ आहे. तर पाश्चिमात्य पद्धतीचे जेवण बनवण्यात त्याचा हातखंडा आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे अनिकेत सराफ नोकरीनिमित्ताने परदेशातच राहतो. इट्स मज्जाशी बोलताना निवेदिता यांनी कामानिमित्त मुलाला दूर रहावं लागत असल्याचं म्हटलं. शिवाय, मुलांचं जग आमच्यापेक्षा मोठं आहे, असंही त्या म्हणाल्या. 

 निवेदिता म्हणाल्या, "अनिकेतची नोकरी परदेशात आहे. कितीही वाटलं तरी तो पटकन उठून येऊ शकत नाही. त्याचा नवा जॉब आहे आणि तो तिथे सेटल होतो आहे. आमच्यापेक्षा त्याच अवकाश मोठं आहे . त्याला जे करायचं आहे आणि त्याचा ज्यात आनंद आहे, त्यातच आमचाही आनंद आहे. पण जग आता इतकं जवळ आलं आहे की, आम्ही त्याच्याबरोबर रोज संपर्क करत असतो". 

'कलर्स मराठी'वर आलेली 'अशोक मा.मा.' ही मालिका मजेदार, खुमासदार आहे. या मालिकेच्या माध्यमातून अनेक वर्षांनी मामा आता छोटा पडदा काबीज करत आहेत. तर निवदिता सराफ यांची 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' ही मालिका आजपासून ( 2 डिसेंबर) 'स्टार प्रवाह’ वाहिनीवर येणार आहे. 

टॅग्स :निवेदिता सराफसेलिब्रिटीस्टार प्रवाहकलर्स मराठी