Join us

निवेदिता सराफ यांना मॉलमध्ये आला वाईट अनुभव, पोस्ट शेअर करत म्हणाल्या, "मी सेलिब्रिटी म्हणून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 09:46 IST

मालाडच्या एका मॉलमध्ये वाईट वागणूक मिळाल्याचं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं.

मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. मालिकेच्या सेटवरील असो किंवा दैनंदिन जीवनातील अपडेट्स त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकताच त्यांना एक वाईट अनुभव आला ज्याची माहिती त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली. मालाडच्या एका मॉलमध्ये वाईट वागणूक मिळाल्याचं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं. यावर अनेकांनी कमेंट करत आम्हालाही असेच अनुभव येतात असं म्हटलंय.

निवेदिता सराफ लिहितात, "मी मालाडच्या इन्फिनिटी मॉलमधील मॅक्स स्टोरमध्ये गेले होते. तिथला स्टाफ फारच वाईट वागणूक देणारा होता त्यामुळे मला फार वाईट अनुभव आला आहे. तुम्ही काय खरेदी करत आहात आणि काय नाही याच्याशी त्यांना काहीच घेणंदेणं नव्हतं. एक मुलगी माझ्याकडे आली आणि मला वेळ नाही सांगत तिने दुसऱ्या सेल्समनला बोलावलं. दुसऱ्या एका सेल्समनने मला ओळखलं आणि माझी माफी मागितली. त्याने मॅनेजरला बोलावलं. मी सेलिब्रिटी आहे म्हणून नव्हे तर मी एक ग्राहक आहे म्हणून मला चांगली वागणूक हवी होती. मी ते डिझर्व्ह करते आणि जो स्टोरमध्ये येईल तो प्रत्येक व्यक्ती हे डिझर्व्ह करतो.'

निवेदिता यांच्या या पोस्टवर अनेकांनी सहमत असल्याची कमेंट केली आहे. अभिनेत्री सुकन्या मोने यांनीही "खरंच आहे' अशी कमेंट केली आहे. तर 'आम्हालाही अनेक ठिकाणी असे अनुभव आले आहेत' अशा कमेंट अनेक नेटकऱ्यांनी केल्या आहेत. निवेदिता यांच्या 'अग्गबाई सासूबाई' आणि 'भाग्य तू दिले मला' या मालिका गाजल्या. सध्या त्या नाटकाच्या दौऱ्यांमध्ये व्यस्त आहेत.

टॅग्स :निवेदिता सराफटिव्ही कलाकारमराठी अभिनेतासोशल मीडिया