मराठी कलाविश्वातील अनुभवी आणि तितकीच मनमिळाऊ अभिनेत्री म्हणजे निवेदिता सराफ. उत्तम अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर निवेदिता यांनी मराठी कलाविश्वाचा एक काळ गाजवला. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. त्यानंतर आता त्यांनी त्यांचा मोर्चा मालिकांकडे वळवला आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी छोट्या पडद्यावरील अनेक मालिका केल्या आहेत. परंतु, एका मालिकेमुळे त्यांना ट्रोल व्हावं लागलं होतं.
अलिकडेच निवेदिता सराफ (nivedita saraf) यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना ट्रोलिंगचा कसा अनुभव आला हे सांगितलं. इतकंच नाही तर या ट्रोलरने ट्रोलिंग करण्याची पार मर्यादा पार केल्याचं त्यांच्या बोलण्यातून लक्षात आलं.
"झी मराठीवरच्या 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतील बबड्या या पात्रावर प्रचंड टीका झाली होती. लोक त्याला खूप नाव ठेवत होते. एवढंच कशाला लोकांना तीव्र स्वरुपाच्या टीकाही केल्या होत्या. यात तुम्ही कोरोना होऊन मेलात तरी चालेल, अशी घणाघाती टीकाही झाली होती. संहितेमध्ये जे लिहिलं आहे ते अभिनयातून व्यक्त करणं हे माझं काम आहे", असं निवेदिता सराफ म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, "टीका करु नका असं मी म्हणत नाही. पण, टीका करुन तुम्ही वास्तव नाकारु शकत नाही. कारण, आजही आपण अशा अनेक आया पाहतो ज्या मुलांना पाठिशी घालतात."
दरम्यान, निवेदिता सराफ सध्या 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत रत्नमाला मोहिती ही भूमिका साकारत आहेत. तसंच त्यांचं 'मी, स्वरा आणि ती दोघं' हे नाटक सुद्धा चांगलंच गाजत आहे. निवेदिता सराफ यांना अभिनयाव्यतिरिक्त पाककलेचीही खूप आवड आहे. त्यांचं 'निवेदिता सराफ रेसिपीज' हे युट्यूब चॅनेल सुद्धा आहे.