आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण करणारी एक मराठी अभिनेत्री पुन्हा एकदा हिंदी मालिकेच्या पडद्यावर झळकणार आहेत. ही अभिनेत्री म्हणजे अनेक मराठी सिनेमा आणि नाटकांमधून स्वतःच्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ.कलर्स हिंदी वाहिनीवरील ‘केसरीनंदन’ या मालिकेत रानीदेवी या मुख्य भूमिकेत त्या दिसणार आहेत.
दोन वर्ष एका मराठी मालिकेत काम केल्यानंतर पुन्हा एकदा हिंदी मालिकेच्या माध्यमातून निवेदिता सराफ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. स्त्रियांचे विश्व चूल आणि मूल इतकेच मर्यादित ठेवणाऱ्या समाजातली एका पेहलवानाची छोटी मुलगी एक भव्य स्वप्न पहाते आणि भविष्यात महिला कुस्तीगीर म्हणून प्रसिद्धी मिळवत, ते स्वप्न सत्यात उतरवते. त्या मुलीचा संघर्ष ‘केसरीनंदन’ या मालिकेतून पहायला मिळणार आहे. ‘मालिकेची कथा राजस्थानच्या धर्तीवर घडणार असल्यामुळे माझी वेशभूषा ही पारंपारिक राजस्थानी स्त्री प्रमाणेच असून आमच्या प्रोडक्शन हाऊसने वेशभूषा आणि सेट यावर खूप मेहनत घेतली आहे. सेटवरचे सगळेच कलाकार मनमोकळे आहेत, एकत्र काम करताना आम्ही खूप धमाल करतो. त्यामुळे मालिकेच्या सेटवर अगदी घराप्रमाणे खेळीमेळीचे वातावरण असते. या मालिकेत कुटुंबाच्या सुखासाठी, आनंदासाठी झटणाऱ्या स्त्रीची भूमिका मला साकारायची आहे. पण त्याचसोबत स्त्रियांकडे बघण्याच्या पारंपारिक दृष्टीकोनाला छेद देणाऱ्या अशा मालिकेचा एक भाग असणे ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे’, अशा भावना निवेदिता सराफ यांनी व्यक्त केल्या. ‘केसरीनंदन’ मालिकेत निवेदिता सराफ या मानव गोहिल आणि अंकित अरोरा या दोघांच्या आईची भूमिका साकारणार आहेत. त्यांना हिंदी मालिकेत पाहणे कमालीचे ठरणार आहे.