रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेला नव्वदाच्या दशकात लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. ही मालिका सुरू असताना रस्त्यावर एकही माणूस दिसायचा नाही अशी त्या काळी परिस्थिती होती. रामायण या मालिकेला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या होत्या. या मालिकेत रामाची भूमिका अरुण गोविल यांनी तर सीतेची भूमिका दीपिका चिखलियाने साकारली होती. त्या दोघांनीही आपल्या भूमिका इतक्या चांगल्या प्रकारे साकारल्या होत्या की, प्रेक्षक त्यांनाच राम आणि सीता समजून त्यांच्या पाया पडण्यासाठी जात असत. या मालिकेने या दोघांनाही प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण अरुण आणि दीपिका यांच्या दर्शनासाठी लोक रांगा लावत असत. तसेच त्यांच्या दर्शनासाठी येताना देवळात ज्याप्रकारे आपण हार, अगरबत्ती, नारळ घेऊन जातो, त्याप्रमाणे लोक घेऊन येत असत.
अरुण गोविल यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात पहेली या चित्रपटापासून केली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. अभिनयक्षेत्रात स्थिरावण्यासाठी ते संघर्ष करत असतानाच त्यांना सावन को आने दो या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटामुळे त्यांची एका आदर्श मुलाची प्रतिमा निर्माण झाली होती. त्यामुळेच त्यांना रामायणात काम करण्याची संधी मिळाली. पण रामानंद सागर यांनी अरुण गोविल यांना ऑडिशनमध्ये रिजेक्ट केले होते. रामाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराला कोणतीही वाईट सवय नसावी असे रामानंद सागर यांचे म्हणणे होते. पण त्याकाळात अरुण गोविल स्मोकिंग करत असल्याने या भूमिकेसाठी ते योग्य नसल्याचे रामानंद सागर यांचे म्हणणे होते. पण त्यांनी स्मोकिंग सोडण्याचा निर्णय घेतल्यानेच या भूमिकेसाठी त्यांची निवड झाली.
अरुण गोविल यांनी रामायण या मालिकेनंतर अनेक मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये काम केले. पण प्रेक्षकांच्या मनात त्यांनी साकारलेल्या रामाची छबी इतकी पक्की बसली होती की, त्यांनी अरुण यांना रामाच्या भूमिकेशिवाय दुसऱ्या कोणत्याही भूमिकेत स्वीकारले नाही. आजही प्रेक्षक त्यांना राम या नावानेच ओळखतात असे ते अनेकवेळा त्यांच्या मुलाखतीत सांगतात. पण या छबीत अडकल्यामुळे त्यांना पुढील काळात अभिनयात यश मिळाले नाही. अभिनयात मिळालेल्या अपयशानंतर ते निर्मिती क्षेत्राकडे वळले. त्यांनी रामायण या मालिकेत लक्ष्मणची भूमिका साकारणाऱ्या सुनील लाहिडीसोबत प्रोडक्शन हाऊस सुरू केले. त्यांचे प्रोडक्शन हाऊस दूरदर्शनवरील मालिकांची निर्मिती करतं. ते सध्या त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये प्रचंड व्यग्र आहेत.
अरुण गोविल यांची पत्नी देखील एक अभिनेत्री आहे. त्यांनी श्रीलेखा या अभिनेत्रीसोबत लग्न केले असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांची मुलगी एका प्रसिद्ध कंपनीत कामाला असून त्यांचा मुलगा देखील अभिनयक्षेत्रापासून दूरच आहे.