गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांचं निधन झाल्याचं पाहायला मिळालं. यामध्येच आता आणखी एका अभिनेत्रीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही तर अभिनेत्रीची आत्महत्या नसून तिची हत्या झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.
छोट्या पडद्यावरील प्रसिद्धी अभिनेत्री रश्मिरेख ओझा ( rashmirekha ojha) हिने राहत्या घरात आत्महत्या केली आहे. भुवनेश्वर येथील घरातून पोलिसांनी तिचं शव ताब्यात घेतलं असून तिच्या वडिलांनी तिच्या लिव्ह इन पार्टनरवर काही गंभीर आरोप केले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, रश्मिरेखा ओझा (Rashmirekha Ojha) भुवनेश्वरमधील नायापल्ली येथे भाड्याच्या घरात राहत होती. या घरात तिने आत्महत्या केली असून तिच्या घरात सुसाईड नोट सापडली आहे. त्यानंतर तिचा प्रियकर संतोष पात्रा याने तिवा आत्महत्या करण्यास भाग पाडलं असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.
"२३ वर्षी अभिनेत्रीने तिच्या भाड्याच्या राहत्या घरात १८ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. सध्या पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. रिपोर्ट आल्यानंतर या आत्महत्येमागील खरं कारण स्पष्ट होईल. सुरुवातीला तिने आत्महत्या केल्याचं जाणवलं. कारण, तिच्या शेजारी सुसाईड नोट सापडली. या पत्रात तिने हत्येमागे कोणालाही दोष दिलेला नाही", असं डिसीपी यांनी सांगितलं.
काय म्हणाले रश्मिरेखाचे वडील?
"शनिवारी आम्ही फोन केला असता तिच्याकडून काहीही रिप्लाय आला नाही. त्यांनी आमचे फोन उचलले नाहीत. त्यानंतर संतोषने अचानक फोन करुन तिच्या निधनाची माहिती दिली. रश्मिरेखा राहत असलेल्या घरमालकांकडून संतोष व तिच्या नात्याविषयी समजलं. ते दोघंही पती-पत्नी असल्याप्रमाणेच राहत होते. याविषयी पूर्वी आम्हाला काहीच कल्पना नव्हती."
दरम्यान, रश्मिरेखा ओझा ही मूळची जगतसिंहपूर जिल्ह्यातील आहे. तिने अनेक उडिया मालिकांमध्ये काम केलं असून केमिती कहिभी कहा या मालिकेतून ती नावारुपाला आली.