'आई कुठे काय करते' मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आशुतोष म्हणजेच अभिनेता ओंकार गोवर्धन (Omkar Govardhan) चांगलाच भडकला आहे. एका इंग्रजी पोर्टलवरील लेखात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा अपमान करण्यात आल्याने त्याने जाहीर निषेध व्यक्त केला आहे. 'इंडिक टेल्स' या इंग्रजी वेबसाईटवरील लेखात सावित्रीबाई फुलेंच्या कामाबद्दल अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आल्याने ओंकारने सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करत निषेध नोंदवला आहे.
ओंकार लिहितो,
"सावित्रीबाई फुलें यांची पुन्हा बदनामी. जाहिर निषेध. सावित्रीबाई फुलेंची शाळा म्हणजे ब्रिटीश सैनिकांना मुली पुरवण्याची सोय अशी मांडणी 'इंडिक टेल्स' नावाच्या पोर्टलवर आहे. या पोर्टलवर इतिहासाची पुनर्मांडणी या नावाखाली अक्षरश: इतिहासाची मोडतोड सुरु आहे.
विसाव्या शतकात मनुस्मृतीच्या समर्थकांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर चिखल शेण दगड गोटे भिरकावले होते आता एकविसाव्या शतकात मनुवादी शक्ती सावित्रीबाई फुलेंवर पुन्हा एकदा चिखल, शेण, दगड, गोटे भिरकावत आहेत. हे अत्यंत वेदनादायी आहे. सजग नागरिकांनी सावित्रीच्या लेकरांनी हे गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाला विनंती केली पाहिजे की, सावित्रीबाई फुले यांचा अवमान करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. हा शिव-फुले -शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. #सत्यशोधक
सावित्रीबाई फुलेंच्या अपमानामुळे ओंकार प्रचंड संतापला आहे. अशी प्रकरणं रोखण्यासाठी कारवाई करावी अशी मागणी त्याने सरकारकडे केली आहे. ओंकारने याआधी त्याच्या कारकिर्दीत 'सावित्रीज्योती' या मालिकेत महात्मा फुलेंची भूमिका साकारली आहे. तर आता तो आशुतोष नावानेच जास्त लोकप्रिय झाला आहे.