सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनचा आगामी थ्रिलर शो एक दिवाना था या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासूनच या कार्यक्रमाविषयी प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. विक्रम सिंह चौहान, नमीक पॉल आणि डोनल बिश्त या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. यामधील अनेक जण हे मुंबईच्या बाहेर राहाणारे आहेत. पण कामाच्या निमित्ताने ते सध्या मुंबई या शहरात राहात आहेत. या मालिकेतील नमिक आणि विकरण हे दोघेही मुळचे देहरादूनचे असून त्यांचे शिक्षण एकाच शाळेत झालेले आहे. त्यामुळे अनेक वेळा चित्रीकरणादरम्यान त्यांच्या शाळेबद्दलच्या गप्पा रंगतात. शाळेच्या आठवणीत ते अनेकवेळा रमतात. एकाच शाळेत असले तरी ते एकमेकांना कधीच भेटले नव्हते. याबाबत नमीक सांगतो, "विक्रमसोबत काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आम्ही आता चांगले मित्र बनलो आहोत. एकदा सहज गप्पा मारताना आम्हाला कळले की आम्ही देहरादूनमधील एकाच शाळेत शिकलो आहोत. हे ऐकून आम्हाला देखील प्रचंड आश्चर्य वाटले होते आणि मुख्य म्हणजे आम्ही एकाच बॅचला होतो. पण आम्ही वेगळ्या विभागात शिकत असल्याने आम्ही एकमेकांना कधीच भेटलो नाही. पण आता आम्ही दोघे एक दिवाना था या मालिकेत एकत्र काम करत आहोत. अनेकवेळा शाळेच्या शिक्षकांविषयी, शाळेतल्या मुलांविषयी आमच्या गप्पा रंगतात. याविषयी विक्रमसिंह चौहान सांगतो, "होय, हे कळल्यावर खरे तर मला देखील शॉकच लागला होता. नमिक आणि मी एकाच शाळेत शिकलो असलो तरी आम्ही शाळेत एकमेकांना कधीच पाहिले नव्हते. आम्ही एक दिवाना था ची शूटिंग सुरु केल्यानंतर काहीच दिवसांत चांगले मित्र बनलो. शूट ब्रेकच्या दरम्यान आम्ही आमच्या शालेय दिवसांबद्दल मजेदार गोष्टी आणि घटना एकमेकांसोबत शेअर करतो. मित्रांसोबत जुन्या आठवणीमध्ये रमण्याची मजा काही औरच असते.
'एक दिवाना था' ही एक थ्रिलर मालिका असून या मालिकेत एक वेगळी कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नमिक पॉलला एक दुजे के वास्ते या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. विक्रम सिंह चौहान कबूल है, एक हसिना थी यांसारख्या मालिकेत झळकले होते.