मुंबई - झी टीव्हीवर सुरू असलेल्या डीआयडी सुपरमॉम्सची अंतिम फेरी संपन्न झाली आहे. यामध्ये देशातील विविध भागातील मॉम्सनी सहभाग घेतला होता. मात्र या स्पर्धेत अशा एका आईनं विजेतेपद पटकावलं, जिच्यासाठी विजेतेपद सोडाच पण या स्पर्धेत सहभागी होणंही एका स्वप्नासारखं होतं. डान्स इंडिया डान्स सुपरमॉमचं विजेतेपद हरयाणामधील हांसी येथील वर्षा बुमार यांनी पटकावलं. कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातून येणाऱ्या वर्षा यांचे पती मजूर म्हणून काम करतात.
वर्षा बुमरा यांनी डान्स इंडिया डान्स सुपरमॉमच्या प्रत्येक भागात अत्यंत मेहनतीने परफॉर्मन्स केला होता. तसेच तिच्या कोरियोग्राफर वर्तिका झा प्रत्येकवेळी तिला चांगलं मार्गदर्शन करायच्या. त्यामुळे वर्षा यांना विजेतेपदापर्यंत पोहोचणं सोपं झालं.
वर्षा यांना या स्पर्धेच्या विजेतेपदाच्या ट्रॉफीसह १० लाख रुपये बक्षीस रक्कम मिळाली. त्याशिवाय त्यांना विविध असाइनमेंटही मिळणार आहेत. प्रेक्षकांनी वर्षा यांना खूप सपोर्ट केला होता. तसेच त्यांना भरभरून मतदान केले. वर्षा यांचे पती बाजारात हमाल म्हणून काम करतात.
पतीच्या पाठिंब्यामुळेच ती या विजेतेपदापर्यंत पोहोचली आहे. वर्षा यांनी कुठल्याही प्रकारचे नृत्याचे प्रशिक्षण घेतले नव्हते. मजुरी करू घरी आल्यावर वर्षा ह्या यूट्युबवरून डान्सचा सराव करायच्या. त्यातूनच त्यांनी नृत्यामध्ये प्राविण्य मिळवले होते.
वर्षा यांचा २०१५ मध्ये नितीन यांच्याशी विवाह झाला. त्यांचा मुलगा गरिशन हा ५ वर्षांचा आहे. मुलाच्या संगोपनासाठी वर्षा यांनी मजुरी करण्यास सुरुवात केली. मात्र डान्सबाबत त्यांचं लहानपणापासून असलेलं प्रेम लग्नानंतरही कायम राहिलं. त्यांच्या पतींनीही या प्रवासात त्यांना पाठिंबा दिला.