'आई कुठे काय करते' मालिकेने काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेने प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळवलं. गेली ४ वर्ष ही मालिका स्टार प्रवाहवर सुरु होती. या मालिकेतील सर्वच कलाकारांवर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. या मालिकेतील एका अभिनेत्रीची चांगलीच चर्चा झाली. ती म्हणजे अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर. मधुराणीच्या आयुष्यात अलीकडेच एक छान योग जुळून आला. त्याबद्दल तिने सोशल मीडियावर अनुभव शेअर केलाय.
मधुराणीच्या आयुष्यात आला खास योग
मधुराणीने व्हिडीओ शेअर करुन लिहिलंय की, "श्री रामदासस्वामी संस्थान, सज्जनगड ह्यांच्या कृपेने एक फार अद्वितीय योग माझ्या आयुष्यात आला. समर्थ रामदासस्वामींच्या प्रत्यक्ष पादुकांची आरती करायचा योग आणि तेही पुण्यातील गजानन महाराजांच्या मठात…!काहीतरी पूर्व पुण्याईच..! सगळ्यांसाठी येणारं वर्ष सर्वार्थाने उत्तम जाऊ दे हेच मागणं मागितलं आहे आणि ह्या निमित्ताने मा. श्री.सुनीलजी देवधर ह्यांच्याशी परिचयाचा सुंदर योगही आला. जय जय रघुवीर समर्थ. गण गण गणात बोते.."
मधुराणी सध्या काय करते?
'आई कुठे काय करते' मालिकेनंतर मधुराणीने मालिकाविश्वातून काहीसा ब्रेक घेतलाय. सलग चार वर्ष शूटिंग केल्यानंतर सध्या मधुराणी तिला मिळालेल्या ब्रेकचा आनंद घेतेय. मधुराणीने मालिकेचं शूटिंग सुरु असतानाच स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर विले पार्ल्याला स्वतःचं घर घेतलं. मधुराणी तिची लेक स्वरालीसोबत अनेक ठिकाणी भटकंती करताना दिसते. 'आई कुठे काय करते' मालिका गाजवल्यावर मधुराणी आता कोणत्या नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.