Dipika Kakar On Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांवर मंगळवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात २६ जणांची त्यांनी गोळ्या मारून हत्या केली, तर तब्बल २० जण जखमी झाले. पर्यटकांच्या आक्रोशाने बैसरन घाटी हादरली. या हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. एकेकाला शोधा, पकडा आणि शिक्षा द्या, जेणेकरून यापुढे असे कृत्य करण्याचा विचारही करताना दहशतवाद्यांना धडकी भरेल, अशी मागणी होत आहे. यातच दहशतवादी हल्ल्याच्या एक दिवसाआधी पहलगाममध्ये असलेली अभिनेत्री दीपिका कक्करनं सोशल मीडियावर दहशतवाद्यांचे फोटो पोस्ट करत त्यांना शिक्षा देण्याची मागणी केली.
दशतवादी हल्ल्यातून दीपिका कक्कर थोडक्यात बचावली. दहशतवादी हल्ल्याच्या एक दिवसाआधी दीपिका ही पती आणि मुलासोबत पहलगामध्ये होती. सुदैवाने हल्ला होण्याच्या दिवशीच सकाळी ते घरी परतले होते. यातच दीपिका कक्करनं दहशतवाद्यांचे फोटो शेअर करत त्यांना फासावर लटकवण्याची मागणी केली आहे. दीपिका कक्करने इंस्टाग्राम स्टोरीवर दहशतवाद्यांचा एक स्केच फोटो शेअर केला आहे. दहशतवाद्यांचे फोटो शेअर करताना तिने पोस्टमध्ये लिहिलं की, 'त्यांना शोधा आणि फाशी द्या'. या हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळावा यासाठी अभिनेत्रीने अपील केलं आहे.
दीपिका ही तिचा पती शोएब इब्राहिम आणि मुलगा रुहानसोबत पहलगाममध्ये फिरत होती. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शोएब इब्राहिमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सुरक्षित असल्याचं सांगितलं होतं. पण, त्याला अनेकांनी ट्रोल केलं. एका नेटकऱ्यानं कमेंट केली की, "तुम्ही दोघे तिथे असता तरी सुरक्षित असता कारण हा हल्ला फक्त हिंदू लोकांवरच झाला आहे".
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये हल्ला झाला तेव्हा दहशतवादी पोलिसांच्या वेशात होते. त्यामुळे पर्यटकांना त्यांचा संशय आला नाही. दहशतवाद्यांनी ४० पर्यटकांना घेरुन आधी त्यांची नावे विचारली आणि विशिष्ट धर्मीय नावे असलेल्या पर्यटकांना गोळ्या घातल्या, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारकडून सिंधू जल करार रद्द करण्यासह पाच मोठे निर्णय घेण्यात आलेत.