जम्मू काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. तर काही पर्यटक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी पर्यटकांचं नाव, धर्म विचारून त्यांना गोळ्या झाडल्याचं समोर आल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही पोस्ट शेअर करत या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. मराठी अभिनेत्री अदिती द्रविडही गेल्या वर्षी काश्मीर फिरायला गेली होती. आता पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथून परत आलेच नसते तर, असा विचारही करवत नसल्याचं अभिनेत्रीने म्हटलं आहे.
अदिती द्रविड गेल्या वर्षी एप्रिलमध्येच काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होती. आणि २२ एप्रिल २०२४ रोजी ती काश्मीरमधील पहलगममध्येच होती. काश्मीर ट्रिपचे काही फोटो शेअर करत तिने पोस्ट लिहिली आहे. अदितीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये काश्मीरचं डोळे दिपवतील असं निसर्गसौंदर्य पाहायला मिळत आहे. हे फोटो शेअर करत ती म्हणते, "विचार करा...त्या शिकारा बोट राइडमधून मी परतच आले नसते तर. त्या पांढऱ्या शुभ्र बर्फाच्छित प्रदेशातील स्वप्न तुमच्या रक्तात रंगली असती. २२-०४-२०२४ गेल्या वर्षी याच दिवशी मी पहालगममध्ये होते. आणि हे फोटो आणि या आठवणी आता तशा राहिलेल्या नाहीत. माझ्या हृदयाला तीव्र वेदना होत आहेत. आणि हे सगळं का कारण मी हिंदू आहे...ते सगळे हिंदू होते".
दरम्यान, पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांबाबत महत्त्वपूर्ण माहिती आता समोर येऊ लागली आहे. हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा एक फोटो समोर आला असून, या दहशतवाद्यांपैकी दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक असल्याचे उघड झाले आहे. पहलगाममधील बैसरन येथे एकूण चार दहशतवाद्यांनी हल्ला केला, तर आणखी तीन दहशतवादी हे त्यांच्या कारवाईवप लक्ष ठेवून होते, अशी माहिती तपासामधून समोर आली आहे. हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांपैकी दोघेजण पश्तून भाषेत बोलत असल्याचीही माहिती मिळाली आहे. या दहशतवाद्यांनी सुमारे १५ ते २० मिनिटे एके-४७ च्या माध्यमातून गोळीबार करत पर्यटकांना टिपून टिपून लक्ष्य केल्याचंही समोर आलं आहे.