सुबोध भावेच्या ‘बस बाई बस’ ( Bus Bai Bus )या शोची भलतीच चर्चा आहे. आत्तापर्यंत अनेक महिला सेलिब्रिटी या शोमध्ये येऊन गेल्यात. अगदी सुप्रिया सुळे, अमृता फडणवीस यांच्यापासून अमृता खानविलकरपर्यंत अनेकजणी. आता या शोच्या आगामी भागात राजकीय क्षेत्रातील आणखी एक दिग्गज व्यक्तिमत्त्व सहभागी होणार आहेत. होय, या शोच्या येणाऱ्या भागात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) दिसणार आहेत.
झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ या नव्या मालिकेत महिला कलाकार, राजकारणी सहभागी होतात यावेळी त्यांना इतर महिलांच्या मनातले प्रश्न विचारले जातात. आता या शोमध्ये पंकजा मुंडे तुफान फटकेबाजी करणार आहेत. याचा एक भन्नाट प्रोमो नुकताच समोर आला आहे. ज्यामध्ये पंकजा यांना काही राजकीय तर काही खासगी प्रश्न विचारण्यात आले आहेत. पंकजा यांनीही यावर भन्नाट फटकेबाजी केली आहे.
पंकजा मुंडे सहभागी झालेल्या ‘बस बाई बस’च्या या प्रोमोमध्ये सुबोध भावे पंकजांना एक भन्नाट प्रश्न विचारतो. ‘तुम्ही कधी दुसऱ्या पक्षाचे आमदार कधी फोडलेत का?’ अशा या प्रश्नावर पंकजा अतिशय मजेशीर आणि फिल्मी उत्तर देतात. ‘'एक आमदार की किमत तुम क्या जानो सुबोध बाबू...,’ असं त्या म्हणतात. पंकजा यांच्या यांचं हे उत्तर ऐकून सगळेच हसू लागतात.
पंकजा मुंडेंचा हा भाग उद्या रात्री 9.30 वाजता प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या भागात अजून काय प्रश्न विचारले जाणार आणि पंकडा मुंडे त्या प्रश्नांना कशा प्रकारे उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं आणि रंजक ठरणार आहे. पंकजा मुंडेचा कधीही न पाहिलेला अंदाज पहायला मिळणार आहे. त्यांच्यातील एक अभिनेत्रीही प्रोमोमधून दिसली. त्यामुळे प्रोमो आल्यापासून पुढच्या भागाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.