द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूड, क्रिकेट क्षेत्रातील सगळेच सेलिब्रेटी या कार्यक्रमात हजेरी लावण्यास उत्सुक असतात. सध्या क्रिकेट वर्ल्ड कप फिव्हर सुरू असून आपण सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. भारतानेच वर्ल्ड कप मिळवावा अशी सगळ्याच क्रिकेट प्रेमींची इच्छा आहे. जगभरात क्रिकेटचा फिव्हर असल्याने यंदाच्या आठवड्यात क्रिकेट क्षेत्रातील काही सेलिब्रेटी द कपिल शर्मा शो मध्ये हजेरी लावणार आहेत. दीपक चहर, सूर्य कुमार यादव आणि पार्थिव पटेल कपिल शर्मा शोमध्ये येऊन कपिल आणि त्याच्या टीमसोबत गप्पा गोष्टी करणार आहेत. त्याचसोबत ‘वन इंडिया, माय इंडिया’चे सुखविंदर सिंह, मिथुन आणि जुबिन नौतियाल देखील कपिल शर्माच्या शोमध्ये धमाल मस्ती करणार आहेत.
द कपिल शर्मा शो मध्ये पार्थिव पटेल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत खेळतानाच्या आठवणींना उजाळा देताना दिसणार आहे. सचिनने टीमला दिलेल्या एका खास शिकवणीविषयी तो या कार्यक्रमात सांगणार आहे आणि त्याचसोबत 2011 च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान मोहालीतील भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या सामन्यातील अनेक रंजक किस्से सांगणार आहे.
पार्थिवने या मॅचच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, सामन्यादरम्यान बाहेरील अन्नपदार्थ घेऊन परिसरात प्रवेश करण्यास आम्हाला सक्त मनाई होती. याच कारणास्तव तिथे अशी परिस्थिती होती की आम्हाला आमच्या ड्रेसिंग रूममध्ये उपाशी रहावे लागले होते. त्यावेळी सचिन तेंडुलकरने आम्हाला एक अद्भुत धडा दिला. त्याने आम्हाला सांगितले की, आपल्याला अन्नपदार्थ येथे घेऊन येणे शक्य नाहीये, त्यामुळे आपल्याला उपाशी राहावे लावणार आहे. तुम्ही सगळ्यांनी सामना जिंकण्यासाठी उपास करा. यामुळे संघाचा आत्मविश्वास वेगळ्याच पातळीवर वाढला.
या कार्यक्रमात कपिलने पार्थिव पटेलला हिंदीतील काही वाक्यं गुजरातीमध्ये भाषांतरीत करायला सांगितली. हे भांषातरण ऐकल्यानंतर उपस्थित प्रेक्षक खळखळून हसले. कपिल सोबत गप्पा मारताना सूर्य कुमार यादव आपल्या स्वीपर शॉटबद्दल सांगणार आहे तर दीपक चहर क्रिकेट संघामध्ये सामील होण्यामागचे खरे कारण सगळ्यांसमोर कबूल करणार आहे.