सोनी टेलिव्हिजन वाहिनीवरील सिंगिंग रियालिटी शो 'इंडियन आयडल-१२'चा विजेता राहिलेल्या गायक पवनदीप राजन (Pawandeep Rajan) आणि उपविजेती अरुणिता कांजीलाल (Arunita Kanjilal) एका कायदेशीर प्रकरणात अडकले आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार अरुणिता आणि पवनदीप यांच्यावर ऑक्टोपस एंन्टरटेन्मेंट कंपनीसोबत करारानुसार म्युझिक अल्बम शूट न करण्याचा आणि त्याचं प्रमोशन करण्यासाठी नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पवनदीप आणि अरुणिता यांना कायदेशीर नोटीस देखील पाठविण्यात आली आहे. यात ऑक्टोपस एंन्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशनशी संपर्क साधला गेल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यात सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं पवनदीप आणि अरुणिता यांच्यासोबत काम करण्याचा करार ऑक्टोपस कंपनीसोबत केला होता असं नमूद करण्यात आलं आहे.
ऑक्टोपस कंपनीनं केलेल्या आरोपानुसार इंडियन आयडल-१२ चे विजेत्यासोबत एकूण २० गाण्यांसाठी करार करण्यात आला होता सोनी पिक्चर्सनं पवनदीप आणि अरुणिता यांच्याबाबत ऑक्टोपस एंन्टरटेन्मेंटच्या करारानुसार सोनीनं दोन्ही कलाकारांना ऑक्टोपस सोबत काम करण्याची परवानगी दिली होती. संबंधित आश्वासन इंडियन आयडल शोचा विजेता घोषीत होण्याआधीच करण्यात आला होता. कंपनीनं यासाठी खूप खर्च करुन एका पत्रकार परिषदेतही अल्बमची घोषणा केली होती. पण कलाकारांनी एका गाण्याचं शूटिंग केल्यानंतर निर्मात्यांसोबत सहकार्य केलेलं नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
प्रथम अरुणिता आणि नंतर पवनदीप यांनी सोनीच्या कराराला न जुमानता निर्मात्याला शूटिंगमध्ये सहकार्य करणे बंद केले आणि नंतर गाण्याच्या रिलीज आणि प्रमोशनमध्ये सहकार्य केले नाही. सोनीला याबाबत कळवल्यावरही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, उलट कलाकारांना पाठिंबा दिला. त्याचवेळी IMPPA ने सोनीला जाब विचारला असता त्यांनी सोनीची ही विशिष्ट कंपनी IMPPA ची सदस्य नसल्याचे सांगत तसे करण्यास नकार दिला आहे.
सोनी कंपनी केवळ चित्रपट, वेब सिरीज तसेच मालिकांसाठी निर्मात्या सदस्यांसोबत काम करते, असं सोनी कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. सोनीचं उत्तर मिळाल्यानंतर, IMPPA नं निर्माते आणि कलाकारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याची विनंती केली आहे. त्यांनी दिलेल्या वचनबद्धतेचं पालन केलं पाहिजे, असं IMPPA नं म्हटलं आहे.