फुलाला सुगंध मातीचा या मालिकेला खूपच कमी कालावधीत चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेचा टीआरपी देखील खूप चांगला असून या मालिकेची कथा, कलाकारांचे अभिनय प्रेक्षकांना चांगलेच भावत आहेत.
आता एक स्तुत्य उपक्रम जामखेडकर कुटुंबीयांनी राबवला आहे. मालिकेतील कलाकारांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेतलाय. जीजी अक्का म्हणजेच अभिनेत्री अदिती देशपांडे यांच्या पुढाकाराने सेटवरच्या प्लास्टिक बाटल्यांचा टाकाऊ पासून टिकाऊ वापर करण्यात येत आहे. सेटवर पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या एकत्र जमा केल्या जातात.
अदिती ताई या रिकामी बाटल्या दादर मधली गल्ली येथील ग्रीन इनिशिएटीव्ह या संस्थेला देतात. या संस्थेमार्फत प्लास्टिकच्या या निरुपयोगी बाटल्यांपासून इंधन निर्मिती केली जाते किंवा बागेत सुशोभीकरणासाठी वापरल्या जातात. गेले वर्षभर अदितीताई हा उपक्रम सेटवर राबवत आहेत. अदिती ताईंच्या या उपक्रमाला फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील सर्वच कलाकार सहाय्य करत असून पर्यावरण रक्षणासाठी झटत आहेत. फुलाला सुगंध मातीचा मालिकेच्या सेटवरचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.