अनेक कलाकार असे आहेत जे आता केवळ अभियन क्षेत्रातच नाही तर उत्पन्नाचं दुसरं माध्यम म्हणून वेगवेगळे व्यवसाय सुरू करत आहेत. स्वत:च्या व्यवसाय सुरू करणाऱ्या कलाकारांच्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली आहे. ती म्हणजे यशोमन आपटे (Yashoman Apte). 'फुलपाखरू' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या यशोमनने स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे.
अभिनेता यशोमनने ठाण्यात (Thane) नुकताच स्वतःचं ‘कॅप्टन कुल’ (Captain Cool Cafe) या नावाने कॅफे सुरू केला आहे. या कॅफेचं उदघाटन नुकतंच झालं असून अभिनेता अभिजित केळकर, आशिष जोशी, स्वानंदी टिकेकर यांनी त्याच्या कॅफेला भेट दिली होती. ह्या कॅफेमध्ये विविध प्रकारचे शेक, थंड पदार्थ, आईस क्रिम आणि आणखीन बरच काही मिळणार आहे.
याआधी मराठीतील अभिनेता संग्राम साळवी, शंतनू मोघे, शशांक केतकर, प्रिया बेर्डे यांनी स्वतःचं हॉटेल तसेच कॅफे सुरू केले. प्रिया बेर्डे यांनी तर कोथरूड परिसरात ‘चख ले ‘ या नावाने हॉटेल सुरू केले आणि यात आणखी एक पाऊल पुढे टाकत त्यांनी याच नावाने पुण्यात दुसरे हॉटेल देखील सुरू केले आहे.
यशोमन आपटे आपल्या सर्वातआधी 'संत ज्ञानेश्वर' या मालिकेतून छोट्या पडद्यावर दिसला होता. या मालिकेत त्याने संत सोपानदेवांची भूमिका केली होती. त्यानंतर त्याला सर्वात जास्त लोकप्रियता मिळाली ती झी युवा वरील 'फुलपाखरू' या मालिकेतून. त्यानंतर तो 'तुझ्या विना', 'झोपाळा', 'बीपी', 'लौट आओ गौरी', '३५% काठावर पास', 'श्रीमंताघरची सून', 'तू इथे जवळी रहा' अशा चित्रपट, नाटक तसेच मालिकांमधून तो महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाला.
यशोमन हा केवळ अभिनेता नाही तर एक गायकही आहे. सोनी मराठीवरील 'सिंगिंग स्टार' या रिऍलिटी शोमधून त्याच्या गायकीची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. यशोमनचे वडील लेखक आहेत तर त्याचे काका दिवंगत अभिनेते विनय आपटे हे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून मराठी सृष्टीत ओळखले जातात. आता त्याने व्यवसायात नवीन एन्ट्री घेतली आहे. त्याच्या अभिनयाच्या करिअरप्रमाणे या व्यवसायतही त्याला यश मिळो याच शुभेच्छा!