Join us  

पाच महिलांच्या मैत्रीची जगात भारी कहाणी! 'पिंगा गं पोरी पिंगा' नवीन मालिकेचा हटके प्रोमो बघाच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 9:53 AM

कलर्स मराठीवरील नवीन मालिकेच्या हटके प्रोमोला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे (pinga ga pori pinga)

कलर्स मराठी चॅनलवर सध्या बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची चर्चा सुरु आहे. या सीझनने TRP चे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. बिग बॉस मराठीचा शेवटचा आठवडा सुरु आहे. या रविवारी बिग बॉस मराठीची ग्रँड फिनाले होणार आहे. अशातच कलर्स मराठीवर एकामागून एक नवीन मालिकांची घोषणा करण्यात येत आहे. कालच आणखी एक नवीन मालिकेची घोषणा कलर्स मराठीवर करण्यात आली. या मालिकेचं नाव 'पिंगा गं पोरी पिंगा'. या मालिकेचा प्रोमो काल भेटीला आलाय. 

'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेमध्ये काय दिसणार?

'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेचा पहिला प्रोमो काल रिलीज झालाय. यात एक मुलगी टॉवरमध्ये असणाऱ्या मैत्रिणीच्या घरात प्रवेश करते. पुढे जेव्हा ती मैत्रिणीच्या दाराबाहेर उभी राहते तेव्हा शेजारची बाई वैतागून म्हणते, "अजून एक नवीन एन्ट्री झाली वाटतं. दिवसभर नुसता खिदळण्याचा आवाज येत असतो." पुढे दार उघडून घरातील मैत्रिणी आपल्या नव्या मैत्रिणीला घरात घेतात. शेजारच्या बायका काय बोलत होत्या, हे ती सर्वांना सांगते. घरात आणखी चार मैत्रिणी असतात. ती म्हणते, त्यांच्याकडे दुर्लक्ष कर आणि चिल मार!

या अभिनेत्री दिसणार नवीन मालिकेत

पुढे पाचही जणी एकमेकींच्या हातावर हात ठेवतात. आपल्या मैत्रीची रंगत न्यारी, जगात भारी आपलीच यारी! असं म्हणत जल्लोष करतात. या मालिकेत शाश्वती पिंपळीकर, ऐश्वर्या शेटे, आकांक्षा गाडे, प्राजक्ता परब आणि विधिशा म्हसकर या पाच अभिनेत्री प्रमुख भूमिकेत आहेत. अभिनेता सुबोध भावे आणि त्याची पत्नी मंजिरी भावे यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. ही मालिका कधीपासून पाहायला मिळणार, याची तारीख निश्चित झाली नाही. दरम्यान प्रोमो बघून प्रेक्षकांना ही मालिका पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

टॅग्स :कलर्स मराठीटेलिव्हिजन