छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतात. या मालिकांमधून घराघरात घडणा-या घडमोडी दाखवल्या जातात. त्यामुळे या मालिकांसोबत रसिकांचं वेगळं नातं निर्माण होतं. मालिकेत घडणा-या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरु आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे या मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात. मात्र छोट्या पडद्यावर वर्षानुवर्षे मालिकांची भाऊगर्दी झाली आहे. मालिकांमधून रसिकांचं मनोरंजन होतं, एकामागून एक भागातून घराघरात या मालिका लोकप्रिय ठरतात आणि ठराविक काळानंतर या मालिका रसिकांचा निरोप घेतात. आणि त्या जागी नवीन मालिका रसिकांच्या भेटीला येतात. गेल्या काही महिन्यांत रसिकांचा भेटीला नवीन मालिका आल्या आहेत. आता आणखी काही मालिका रसिकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाल्या आहेत.
१७ जानेवारीपासून रात्री ११ वाजता नवी मालिका 'पिंकीचा विजय असो' सुरु होणार आहे.आयुष्य भरभरून जगणाऱ्या अतरंगी आणि सतरंगी पिंकीची गोष्ट या मालिकेतून उलगडेल. खाईन तर तुपाशी अशा ठाम विचारांच्या असणाऱ्या पिंकीला फिल्मी दुनियेचं फार आकर्षण आहे. तिच्या रहाण्यातून, वागण्यातून आणि बोलण्यातून ते प्रकर्षाने जाणवतं. अशी ही स्वप्नाळू पिंकी आपली स्वप्न कशी पूर्ण करते हे मालिकेतून पाहायला मिळेल. नवोदित अभिनेत्री शरयू सोनावणे पिंकी ही भूमिका साकारणार असून तिचा हटके अंदाज रसिकांना नक्कीच आवडेल.
या मालिकेविषयी सतीश राजवाडे म्हणाले, 'पिंकी हे कुतुहल निर्माण करणारं पात्र आहे. जगण्याची उर्मी देणारं, परिस्थितीला न घाबरणारं आणि सतत विजयी कसं होता येईल याचा ध्यास असणारं. सध्याच्या परिस्थितीत असं पात्र रसिकांचं मनोरंजन करेल तसंच स्फुर्ती सुद्धा देईल.'