'अनुपमा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेनं अल्पावधीतच रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील मुख्य म्हणजेच अनुपमाची भूमिका अभिनेत्री रुपाली गांगुली साकारते आहे. आता या मालिकेची भूरळ चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही पडल्याचे दिसून आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'अनुपमा'चा व्हिडीओ शेअर करून दिवाळीपूर्वी जनतेला खास संदेश दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'वोकल फॉर लोकल मूव्हमेंट'ला प्रोत्साहन देण्यासाठी मायक्रो ब्लॉगिंग साइट X (ट्विटर) वर 'अनुपमा'चा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अनुपमा उर्फ रुपाली गांगुली ऑन-स्क्रीन पती अनुज कपाडिया (गौरव खन्ना) सोबत दिवाळीची तयारी करताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये दिसते की, अनुपमा आणि अनुज त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह दिवाळीच्या तयारीसाठी लोकल साहित्य वापरताना दिसत आहेत. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकल व्यसायांना प्रोहत्साहन दिलं. शिवाय त्यांनी वोकल फॉर लोकलच्या जाहिरातीसोबतच डिजिटल पेमेंटलाही प्रोत्साहन दिले. अनुपमाचा व्हिडीओ शेअर करताना पीएम मोदींनी ट्विटमध्ये लिहिले की, 'देशभरात #VocalForLocal ला मोठी गती मिळत आहे'.
पीएम मोदी व्हिडीओमध्ये म्हणाले, "मित्रांनो सणांमध्ये आपले प्राधान्य स्थानिकांसाठी असले पाहिजे. आपण सर्व जण मिळून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करुया. लोकल दुकानांमधून वस्तू खरेदी केल्यानंतर स्थानिक दुकानदारांसोबत सेल्फी घ्या आणि नमो अॅपवर शेअर करा जेणेकरून इतरांनाही त्यातून प्रेरणा मिळू शकेल'.
अनुपमा ही मालिका लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत जवळपास सर्वांनाच आवडते. यापुर्वीही 'अनुपमा'मधील डायलॉगचा वापर करत मुंबई पोलिसांनी लोकांना आवाहन केले आहे. या लोकप्रिय मालिकेचा मराठीतही रिमेक करण्यात आला आहे. 'आई कुठे काय करते' असे या मालिकेचे नाव आहे. मराठी टेलिव्हिजन विश्वातही ही मालिका सुपरहिट आहे.