अवधूत गुप्ते(Avadhoot Gupte)चा लोकप्रिय शो 'खुपते तिथ गुप्ते'(Khupte Tithe Gupte) चा यंदाचा सीझन खूपच चर्चेत आहे. आतापर्यंत या शोमध्ये राज ठाकरे, नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यासारख्या राजकारणी मंडळींनी हजेरी लावली होती. त्यानंतर आता राजकारणात उतरु पाहणाऱ्या उर्मिला मातोंडकर(Urmila Matondkar)लाही बोलवण्यात आले होते. खुपते तिथे गुप्ते या शोमध्ये आल्यानंतर उर्मिलाने गुप्तेच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली तर काही गुपितं देखील उघड केली. उर्मिला मातोंडकरचे शोमधील प्रोमो समोर आले आहेत, जे व्हायरल होताना दिसत आहेत.
खुपते तिथे गुप्ते शोमध्ये अवधूत गुप्ते उर्मिला मातोंडकरला म्हणाला की, एका नटीबरोबरच्या भांडणांमध्ये महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी तुमची बाजू घेतली नाही, त्यावर उर्मिला म्हणाली की नाही..राजकारणी जे स्वतःला नेते समजतात अशा लोकांनी मात्र दुसरीकडेच बघायला सुरुवात केली. कारण मला असे वाटते आपल्या मातीतील आपल्या प्रदेशातील आपली व्यक्ती आणि तिच्यावर जेव्हा इतकी भयानक आणि गलिच्छ, खालच्या दर्जावरची गोष्ट बोलली जाते. तेव्हा हे त्यांचे कर्तव्यं असतं.
माझ्यासारख्या व्यक्तीसोबत न उभे राहणारी लोक सामान्य लोकांकरीता काय उभे राहणार? , असे म्हणत तिने राजकारण्यांवर निशाणा साधला.
काय आहे हे प्रकरण?खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात अवधुत गुप्तेने कंगना राणौत सोबत झालेल्या वादावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. उर्मिला राजकारणात प्रवेश करतेय हे कळताच त्या दोघींमध्ये खडाजंगी सुरू झाली होती. त्यावेळी एका मुलाखतीत कंगणाने उर्मिलाला सॉफ्ट पॉर्नस्टार असल्याचे म्हटले होते. उर्मिला चांगली अभिनेत्री नाही पण ती सॉफ्ट पॉर्नस्टार आहे आणि यामुळे तिला सहज तिकीट मिळू शकते असे भाष्य कंगनाने केले होते.
२०१६ साली उर्मिलाने मोहसीन मीरसोबत केले लग्न
२०१६ साली उर्मिलाने मोहसीन मीर सोबत लग्न केले. लग्नानंतर तू तुझा धर्म बदलला का? हा प्रश्न कार्यक्रमात विचारताच उर्मिलाच्या चेहऱ्यावर आठ्या पसरल्या. या प्रश्नाचे उत्तर ती काय देते हे तुम्हाला खुपते तिथे गुप्तेच्या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे एकंदरीतच उर्मिलाची ही मुलाखत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे.