Join us

​महाराष्ट्रभरात वाढतेय 'विठूमाऊली'ची लोकप्रियता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 10:52 AM

महाराष्ट्राचं लाडकं आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठलाचं तिन्हीसांजेला दर्शन घडवणारी 'विठूमाऊली' ही स्टार प्रवाहची मालिका महाराष्ट्रभरात लोकप्रिय झाली आहे. लहानांपासून ...

महाराष्ट्राचं लाडकं आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठलाचं तिन्हीसांजेला दर्शन घडवणारी 'विठूमाऊली' ही स्टार प्रवाहची मालिका महाराष्ट्रभरात लोकप्रिय झाली आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत, गावांपासून शहरांपर्यंत सगळेच विठ्ठलभक्त 'विठूमाऊली' मालिकेमुळे विठूनामाचा गजर करत तल्लीन होत आहेत.लोकोद्धारासाठी झालेला विठ्ठल अवतार, भक्तांना माहीत नसलेली विठ्ठलाची कहाणी या पौराणिक मालिकेतून सादर करण्यात आली आहे. विठ्ठल, रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्यातलं नातंही ही मालिका उलगडत आहे. त्याशिवाय पंढरपूर क्षेत्राची निर्मिती, विठ्ठल पालखी सोहळा, विठ्ठलाचा मुकूट आणि आभूषणे यांच्याही रंजक कथा या मालिकेतून पाहायला मिळत आहेत. उत्तम निर्मितीमूल्य, कसलेले कलाकार आणि अभ्यासू लेखनामुळे या मालिकेने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. 'विठूमाऊली' साकारणाऱ्या अजिंक्य राऊतला अनेक प्रेक्षकांनी फेसबुक, इन्स्टाग्रामद्वारे मेसेज करून मालिका आवडत असल्याचे कळवले आहे. 'विठूमाऊली' दिसत असललेल्या टीव्हीला किस करणाऱ्या लहान मुलाचा फोटो अजिंक्यने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो अजिंक्यला त्याच्या एका फॅनने पाठवला होता.मालिकेला मिळत असलेल्या प्रेक्षकांच्या पसंतीविषयी अजिंक्य सांगतो, "खूप ठिकाणचे तरूण मला 'विठूमाऊली' मालिका आवडत असल्याचे कळवतात. त्यांना शीर्षक गीत आवडतं, गोष्टीची मांडणी आवडते, मालिकेची भव्यता आवडते. कित्येक ज्येष्ठ प्रेक्षक दर्शन घेण्याच्या भावनेतून संध्याकाळी टीव्हीसमोर येऊन बसतात. माझ्या ओळखीतल्या एक गुजराती आजी आहेत. त्यांना नीट मराठी कळत नाही. मात्र, 'विठूमाऊली' मालिकेत कृष्णाचे दर्शन होते, म्हणून त्या आवर्जून ही मालिका बघतात."स्टार प्रवाहची 'विठूमाऊली' ही मालिका पाहण्याची प्रत्येक प्रेक्षकाची भावना वेगळी आहे. मात्र, प्रत्येकाला 'विठूमाऊली' आवडते हेच यातून दिसून येतं. मालिकेत या पुढील काळात अनेक नवनव्या घटना, कहाण्या पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्राचे लाडकं आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाची भव्यदिव्य कहाणी सांगणारी 'विठूमाऊली' मालिका यापुढे देखील प्रेक्षकांचे तितकेच मनोरंजन करेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. 'विठूमाऊली' या मालिकेची निर्मिती कोठारी व्हिजनने केली असून याआधी त्यांच्या जय मल्हार या पौराणिक मालिकेला देखील प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. Also Read : ५५० जणांच्या ऑडिशन्समधून विठूमाऊलीची भूमिका साकारण्यासाठी अजिंक्य राऊतची झाली निवड